भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कौन्सिलच्या बैठकीत डॉ. भालचंद्र कांगो यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. औरंगाबाद मतदारसंघातून ते उमेदवार असतील, असे ७१ सदस्यीय कौन्सिलने ठरविलेल्या निर्णयात म्हटले आहे.
सध्याच्या स्थितीता डॉ. कांगो यांनी ही निवडणूक लढविणे कसे योग्य आहे, याची माहिती प्रा. राम बाहेती यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली. समाजातील विविध स्तरातून त्यांच्या उमेदवारीबाबत विचारण होत असल्याचे प्रा. बाहेती यांनी सांगितले. त्यांनी निवडणूक लढवावी, असा ठराव मांडण्यात आला. त्यावर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह ४० सदस्यांनी चर्चा केली. जिल्हास्तरावर केलेला हा ठराव मुंबईत १८ व १९ जानेवारीला होणाऱ्या राज्य कौन्सिलच्या बैठकीस पाठविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची मोहीम गेल्या ५ महिन्यांपासून औरंगाबाद जिल्ह्य़ात सुरू आहे. त्याचा आढावा या वेळी घेण्यात आला. दि. ३१पर्यंत निधी संकलन मोहीम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. २५ ते ३१ जानेवारीदरम्यान महागाई विरोधी आंदोलन होत असून त्याचे नियोजनही करण्यात आल्याचे भाकपने कळविले आहे.