नगरकरांना आता परिवर्तन हवे आहे. सध्याच्या कारभाराला लोक कंटाळले असून त्यामुळेच महानगरपालिकेत काँग्रेसच्या दृष्टीने आशादायक वातावारण आहे. यंदा सत्ता ताब्यात घेऊन काँग्रेसचाच महापौर होईल असा दावा बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या मंत्रीद्वयांनी शनिवारी नगरला पत्रकारांशी बोलताना केला.
महनगरपालिका निवडणुकीतील इच्छुकांच्या काँग्रेसने आज मुलाखती घेतल्या. या मुलाखती दरम्यान मंत्रीद्वयांनी पत्रकारांशी संवाद साधला. एकुण ६८ प्रभागांसाठी पक्षाकडे १२७ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. दोन्ही मंत्र्यांसह पक्षाचे निरीक्षक आमदार शरद रणपिसे, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा, विनायक देशमुख, उबेद शेख आदींनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. पक्षाचे शहर जिल्हा सरचिटणीस तथा या समितीचे एक समन्वयक अनंत देसाई मात्र मुलखतींना अनुपस्थित होते.  
राज्य व केंद्रात दोन्ही काँग्रेसची आघाडी आहे, त्यामुळे स्वाभाविकच स्थानिक स्वराज्य संस्थामंध्येही तोच धोरणात्मक निर्णय राहील. त्यामुळे नगरच्या मनपा निवडणुकीतही दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार असून त्यादृष्टीने प्राथमिक बोलणीही झाली आहे. दोन्ही पक्षांनी इच्छुकांची चाचपणी केल्यानंतर जागांची निश्चिती होऊन आघाडीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल असे दोन्ही मंत्र्यांनी सांगितले. आता उमेदवारी अर्जासोबतच एबी फॉर्म द्यायचे असल्याने येत्या दोन, तीन दिवसात ही प्रक्रिया पुर्ण होईल असे ते म्हणाले.
शहरातील सर्व प्रभागांमध्ये काँग्रेसला मोठा प्रतिसाद लाभला आहे. नगरकरांना बदल हवा आहे. विशेषत: विकासाच्या मुद्दय़ावर लोकांमध्ये सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर मोठी नाराजी असून ही नाराजी मतदानातून प्रकट होईल, त्याचा सर्वाधिक फायदा काँग्रेसलाच होईल. मात्र काँग्रेस केवळ राजकीय फायदा घेणार नाही, नगरकरांना उत्तम व्यवस्था देऊ, शहरात बदल घडवून दाखवू असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला.