गेली अनेक वर्षे येथे तळ ठोकून असलेल्या १३ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
येत्या मे मध्ये सार्वत्रिक निवडणुका होतील, असा अंदाज आहे. ज्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यात ३ वष्रे पूर्ण झाली आहेत, अशांची अन्य जिल्ह्यात बदली करण्यात यावी, असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बदलीपात्र पोलीस निरीक्षकांची यादी मागवली होती. जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत कार्यरत १३ निरीक्षकांच्या बदल्यांचा प्रस्ताव पाठविण्यात आला.
इतवारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनाथ कोडे ८ वर्षांपासून, अशोक घुगे ७ वर्षांपासून, तर विमानतळ ठाण्याचे वादग्रस्त निरीक्षक ५ वर्षांपासून नांदेडात तळ ठोकून आहेत. या तिघांसह नायगावचे श्रीकांत फुलझळके, शहर वाहतूक शाखेचे पंडित मुंडे, धर्माबाद येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत गोवर्धन कोळेकर, देगलूरचे हनुमान परांडे, भोकरचे योगेश गावडे, उमरीचे संभाजी िनबाळकर, सिडको पोलीस ठाण्याचे उत्तम मुंडे, मुखेडचे राजकुमार केंद्रे व शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील संजय देशमुख यांच्या बदलीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या अटळ असल्याचे मानले जाते.
पोलीस निरीक्षकांसह गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत ६ सहायक निरीक्षक, १० उपनिरीक्षक यांच्या बदलीचा प्रस्तावही पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.