गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात वणव्यांमुळे ताडोबा व कोळशाचे हजारो हेक्टर जंगल जळाल्याचा धसका घेऊन उन्हाळ्यात लागणाऱ्या आगीपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प वनविकास महामंडळाने केला आहे. त्यामुळेच ५० लाख रुपये खर्चून १ ते १५ फेब्रुवारीपर्यंत अग्निरेषा जाळण्याचे काम हाती घेण्यात आले असून ताडोबा वन वणवाविरहित ठेवण्याची योजना वन विभागाने आखली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्र ६२५.४० चौ.कि.मी. असून या क्षेत्राची विभागणी ताडोबा, मोहुर्ली व कोळसा, अशा तीन परिक्षेत्रात करण्यात आलेली आहे. या विभागातील अग्नी संरक्षणाची कामे महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे पश्चिम चांदा वन प्रकल्प विभागाचे अधिनस्थ असलेले आधुनिक वन वणवा प्रतिबंधक प्रकल्पाकडून करण्यात येतात. या यंत्रणेत विशेष प्रशिक्षित दोन वनपरिक्षेत्र अधिकारी, ११ वनरक्षक व १११ हंगामी अग्निरक्षक आहेत. आगीचा शोध घेण्यास १६ वॉच टॉवर्स असून शिघ्र अग्निरक्षक कार्यदल व संदेश वाहनाकरिता बिनतारी यंत्रणा आहे, तसेच दोन मिनिबस व दोन इतर वाहने आहेत. आधुनिक वनवा प्रतिबंधक प्रकल्पाकडे आग विझवण्याचे सर्व अत्याधुनिक यंत्र भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. २०१३ च्या हंगामात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील वन वनवा व्यवस्थापनासाठी केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत ५० लाखाचा निधी वनविकास महामंडळाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ११२८ कि.मी.अग्निरेषा कटाई जलाईसाठी लागणारा खर्च, वाहनावर होणारा खर्च, अग्निरक्षकांची मजुरी, आग विझविण्याकरिता खर्च हा केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत उपलब्ध अनुदानापेक्षा जास्त झाल्यास ताडोबा अंधारी हे महत्वाचे ठिकाण असल्याने वनविकास महामंडळ त्यांचेकडील अनुदान सुध्दा खर्च करणार आहे.  फायर लाईनचे कामात सहभागी झालेल्या मजूरांचा विमा सुध्दा काढण्यात येतो. एफडीसीएमकडे उपलब्ध वाहनांव्यतिरिक्त वनखात्याकडून दोन फायर इंजिन देण्याचे नियोजित आहे. सद्यस्थितीत अग्निरेषा कटाईची कामे झाली असून १५ जानेवारी रोजी अग्निरेषा जाळणे, तसेच अचानक आगी लावल्यास त्यास विझविणेबाबत एक प्रात्याक्षिक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आयोजित करण्यात आले होते. वनरक्षक उदय अवसक यांनी वनविकास महामंडळाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी, महाव्यवस्थापक संजय ठाकरे, उपसंचालक गिरीश वरिष्ठ, विभागीय व्यवस्थापक बी.टी.भगत व इतरही क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. अग्निरेषा जाळण्याची कामे १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान करण्याचे वनविकास महामंडळाने आयोजिले आहे.