शाळांमध्ये सहलींचा ऋतू सुरू होतोय. मुलांना बाहेरच्या जगाचं निरीक्षण करता यावं, हा सहलीमागचा विचार असतो. मात्र हा मूळ हेतूच धाब्यावर बसवून आज मुंबईतल्या बहुतांश शाळा मुंबईनजिकच्या रिसॉर्ट्समध्ये सहल नेतात. शाळकरी मुलांना या सहलींमधून निरीक्षण करता येतं ते त्या रिसॉर्ट्सचं, तिथल्या तरणतलावांचं आणि मोठमोठाल्या घसरगुंडय़ासारख्या क्रीडाप्रकारांचं. आपल्या माथी सहल आयोजनाची कटकट नको, म्हणून मुंबईतल्या अनेक शाळांचं व्यवस्थापन आज सर्रास रिसॉर्टस्मध्ये दिवसभराच्या सहलीचं आयोजन करू लागलं आहे. आणि हे करताना तिथे उपलब्ध असलेलं उत्तम खाणं, मुलांची सुरक्षा अशी वेगवेगळी कारणं शाळा पुढे करतं. मात्र यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होतात. जी धम्माल मुलं आपल्या पालकांबरोबर करू शकतील, अशा ठिकाणची सहल मुळात शाळेने योजावी का? त्यातून मुलांना काय बरे शिकायला मिळते? दरवर्षी त्याच त्या ठिकाणी (विद्यार्थ्यांची बॅच मात्र नवीन असते) सहल नेण्यामागे शाळेचे आणखी काही हितसंबंध (आर्थिक?)असतात का? अशा वेळी मुळात शाळांची सहल ही केवळ मौजमजेसाठी असावी का, हा प्रश्न उपस्थित होतो.
आíथकविषमता पोसणाऱ्या या सहल पर्यायांची ओळख विद्यार्थ्यांना शाळेच्या स्तरावर होण्याची खरंच आवश्यकता असते का, यासंदर्भात  पर्यावरण अभ्यासक व प्रशिक्षक पार्थ बापट म्हणाले की, ‘सहल उपक्रमाबाबत शाळेने सामायिक किमान उपक्रम आखण्याची नितांत गरज आहे. यात विद्यार्थ्यांना आपल्या राज्याची ओळख व्हावी हा मुख्य हेतू असावा. जर अजिंठय़ासारख्या ठिकाणी शाळेची सहल जात असेल तर तिथला भूगोल, इतिहास समजून सांगण्याच्या दृष्टीने काय दाखवायचं हे शाळेला आधीच सुस्पष्ट असावं. सहलीला जाऊन आल्यानंतर मुलांकडून त्याविषयी अहवाल लिहून घ्यावा. मुळात देश जोडला जाईल, या मध्यवर्ती संकल्पनेने शाळांनी सहल आयोजन करायला हवे. एखादा भूभाग, तिथल्या लोकांचं जगणं, तिथल्या नद्या, पर्यावरण संवर्धन, सहकार चळवळींचा अभ्यास हा हेतू असायला हवा.
मात्र शाळा सहलींच्या या बजबजपुरीत विद्यार्थ्यांच्या सहल उपक्रमाचा संवेदनशीलतेने विचार करणाऱ्याही काही शाळा आहेत. या शाळांकडून आणि त्यांच्या उपक्रमामधूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे. मुलांना जीवनानुभव देणाऱ्या आणि मुलांच्या सोबत कायम राहतील अशा श्रीमंत आठवणी देणाऱ्या फार खर्चिक सहलींच्या आयोजनाची गरज नसते, हे या शाळांनी सिद्ध केले आहे.
‘सहाध्याय दिन’
आम्ही याला ‘सहाध्याय दिन’ असे म्हणतो. यात पक्षीनिरीक्षण आणि त्याचा दस्तावेज करणे, लेण्यांचा अभ्यास, पुण्यात एनसीएलसारख्या संस्था नेमके काय काम करतात, हे समजून घेणे, सहानुभवाच्या दृष्टीने अंधशाळेत शिकवणे, सीडब्ल्यूपीआरएस सारख्या संस्थेत जी धरणांची मॉडेल्स ठेवली आहेत, ती मुलांनी समजून घेणे यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. जे अनुभव विद्यार्थ्यांना वर्गात बसून घेता येणार नाहीत, त्यासाठी हे उपक्रम योजले जातात. आमच्या शाळेतर्फे चैनीसाठी म्हणून सहल काढली जात नाही. मात्र आम्ही विद्यार्थ्यांना ट्रेकिंगला नेतो. किल्ला पाहणे, जैवविविधता समजून घेणे आणि त्यासोबत विद्यार्थ्यांनी मौजही करणे हे शाळेला यात अभिप्रेत असते. या सहली अल्पखर्चात होतात. पुण्यातील अथवा पुण्याजवळच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेताना कधी सायकलने, तर पीएमटी अथवा एसटीने नेले जाते, मुलांनी डबा घरून आणायचा असतो. आमच्या काही सहली तर केवळ प्रतिविद्यार्थी २० रुपये आकारूनही झाल्या आहेत.
 डॉ. मिलिंद नाईक, प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी, पुणे
नेहमीच काहीतरी वेगळे..
विद्यार्थ्यांना समाज कसा बघता येईल, याचा विचार सहल आखताना शाळेतर्फे आवर्जून केला जातो. नर्मदा विस्थापितांच्या मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या जीवनशाळा बघायला घडगावच्या पुढे गुजरात – महाराष्ट्र सीमेवरच्या गावात आम्ही मुलांना नेलं होते. त्या झोपडीवजा शाळा, भोवती पसरलेले नर्मदेचे अफाट पाणी, स्थानिक बोलीतील गाणी यांनी मुलांच्या भावविश्वात कायमचे घर केले. कधी कर्णबधिर शाळेतील मुलांशी गप्पा, कधी अंधशाळेला भेट, आश्रमशाळेतील मुलांसोबत एक दिवस, कधी मासवण येथील आदिवासी सहज शिक्षण केंद्रातील मुलांशी संवाद अशा कितीतरी भेटी दरवर्षी पाचवीपासून पुढच्या मुलांसाठी योजल्या जातात. तर बालवाडीपासून मुले परिसरात फेरफटका मारतात. क्षेत्रभेटीत तर वेधशाळा, रक्तपेढी, नाणेसंग्रहालय अशा विविध स्थळांचा समावेश असतो.
विनोदिनी काळगी, मुख्याध्यापक, आनंदनिकेतन, नाशिक.
शिकण्यासाठी पूरक संधी
अगदी लहानग्यांना आम्ही शाळेच्या आवाराचे निरीक्षण करायला सांगतो. परिसरातील पीठ गिरणी, बँक, मंडईत सहल काढून काम करणाऱ्या व्यक्तींशी मुले संवाद साधतात. सातवीच्या मुलांना रात्री रायगड चढण्याची सहल असते. त्यातील साहस, थरार मुलांसमोर इतिहास जिवंत करण्यासाठी उपयोगी पडतो. आठवी-नववीच्या मुलांना अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीने भिवापूर बचत गटाचे कामकाज बघायला नेले जाते. आठवीच्या मुलांना दापोलीला रेणूताई दांडेकरांच्या सहलीला नेले जाते. पाबळ विज्ञानाश्रमाची सफर घडवली जाते. मुलांना त्यांच्या वयानुसार, इयत्तेनुसार आणि त्यांच्या अभ्यासक्रमानुसार शिकण्यासाठी पूरक संधी मिळावी, या दृष्टिकोनातूनच शाळा सहल उपक्रमांचा विचार करते.
गौरी देशमुख, शिक्षिका, अक्षरनंदन, पुणे.