देशपातळीवरील दोन दिवसीय औद्योगिक बंदला बुधवारी कोल्हापुरातील श्रमिकांनी चांगला प्रतिसाद दिला. संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार आंदोलनात उतरल्याने औद्योगिक पातळीवर शांतता होती. सर्व कामगार संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चामध्ये सुमारे ४ हजारांहून अधिक कामगार सहभागी झाले होते. बंदमुळे बँक ग्राहकांना चांगलाच फटका बसला.     
विमा, बँक, वाहतूक यासह विविध मागण्यांसाठी देशातील अकरा कामगार संघटनांनी दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे. बुधवारी पहिल्या दिवशी या आंदोलनाला कोल्हापुरातील कामगारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काम बंद ठेवून संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार मिरवणुकीत (रॅली) सहभागी होण्यासाठी टाऊन हॉल येथे जमले. ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे, सरकारी नोकर युनियनचे नेते लवेकर, एमएसीबी वकर्स फेडरेशनचे बाबुराव आरळी, दिलीप पोवार, कॉ. रघुनाथ कांबळे यांची भाषणे झाली. येथून निघालेल्या रॅलीत आयटक, सिटू, इंटक, हिंद मजदूर, भारतीय मजदूर संघ आदी संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले होते. महापालिका, बिंदू चौक, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी, आईसाहेब पुतळा मार्गे मिरवणूक बिंदू चौकात आली.
कामगार विरोधी शासकीय धोरणाच्या निषेधाच्या घोषणा कामगारांकडून दिल्या जात होत्या. एफडीआयविरोध, खासगीकरण विरोध, वृध्दांना निवृत्तिवेतन, संघटित कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये वेतन, फेरीविक्रेते कायद्याची अंमलबजावणी, मोलकरीण हक्क मेळावे, सर्वाना ३५ किलो धान्य, अन्न सुरक्षा विधेयक या संदर्भातील मागण्यांचे फलक कामगारांनी हातात घेतले होते. मिरवणूक बिंदू चौकात पोहचल्यावर तेथे कॉ. पानसरे, कॉ. चंद्रकांत यादव यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. सरकारी धोरण व खासगीकरणाच्या विरोधात कामगारांनी संघटित होऊन लढावे, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून वृत्तपत्रांचे वितरण केले. त्यानंतर ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. उद्या गुरुवारी या आंदोलनामध्ये महिला कर्मचारी व महिला संघटना सहभागी होणार असून त्यांचीही शहराच्या उर्वरित भागात रॅली निघणार आहे.