पाल व इंदोली उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी आले. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी नेणे आमदार बाळासाहेब पाटील, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले आता, या योजना उत्तमरीत्या चालविण्याची जबाबदारी शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन करताना, याबाबत सह्याद्रीचा इरिगेशन विभाग सक्षम असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. हरणबरवाडी-धनगरवाडी योजनेच्या कामाचे भूमिपूजन लवकरच करणार असल्याची घोषणा त्यांनी या वेळी केली.
कराड तालुक्यातील श्री क्षेत्र पाल येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन व भूमिपूजन अशा कार्यक्रमानंतर जाहीर सभेत ते बोलत होते. अधिवासी कल्याण मंत्री बबनराव पाचुपते, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ, उपाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, संजयकाका पाटील, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील यांच्यासह स्थानिक मान्यवर व शेतकऱ्यांची या वेळी उपस्थिती होती.
अजित पवार म्हणाले की, एआयबीपीच्या माध्यमातून तारळी धरणाचे पाणी पन्नास मीटर हेडवरून शंभर मीटर हेडपर्यंत उचलून वंचित क्षेत्राला देण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, राष्ट्रीय कृती विकास योजनेला गती देण्याचा आघाडी सरकारचा प्रयत्न असून, यामाध्यमातून अनेक योजना राबविल्या जात आहेत. पाल, इंदोली उपसा सिंचन योजनेसाठी सुमारे सत्तावीस कोटी रूपये खर्च झाला आहे. धरणे केल्याशिवाय क्षेत्र ओलिताखाली येत नाही. मात्र आमचेच अभियंता उपसा सिंचन योजना चुकीच्या असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
हणबरवाडी-धनगरवाडी योजनेची वर्कऑर्डर लवकरच निघून त्याचे भूमिपूजन करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. वेळेवर वीजबिल भरणाऱ्यांच्याच पाणी योजना यापुढे चालतील. तरी, वीज बिले वेळेत भरण्याची सवय लागणे व योजना उत्तमरित्या चालणे आवश्यक आहे. महावितरणच्या एबीसीडीच्या गटात कराड विभाग येत असल्याने ग्रामीण व शहरी भागात भारनियमन होत नाही. सुमारे एक कोटी सत्तर लाख खर्च करून पाल येथे महावितरणचे उपकेंद्र साकार झाल्यामुळे अनेक गावांना याचा लाभ मिळणार आहे. प्रत्येकाने मनाचा मोठेपणा दाखवून जास्तीत जास्त मदत दुष्काळग्रस्तांना करावी असे आवाहन पवार यांनी केले. या वेळी तारळी, टेंभू, ताकारी, म्हैसाळ आदी धरणांतील पाण्यामुळे ओलिताखाली येणारे क्षेत्र याची आकडेवारी त्यांनी मांडली.
बाळासाहेब पाटील म्हणाले की, तारळी धरणाचे शंभर मीटर हेडपर्यंत पाणी उचलल्याशिवाय उर्वरित क्षेत्र ओलिताखाली येणार नाही. शासनाने ही उपसा सिंचन योजना केली आहे. मात्र, ती चांगली चालविणे ही प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी आहे. जे म्हणतात ते करतात तेच दादा, अशी अजित पवारांच्या कामांची प्रशंसा त्यांनी केली.
प्रास्ताविकात देवराज पाटील यांनी अजित पवार, बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पाल विभागाचा कायापालट झाला असल्याचे सांगितले. सरपंच मंगेश कुंभार यांनी आभार मानले.