आगामी गणेशोत्सवात विदर्भासह नागपुरातील सर्व पोलीस ठाण्यांना सजग राहण्याचे आदेश असून सर्व पोलिसांच्या साप्ताहिक सुटय़ा रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित मंडळे वा संस्थांनाही सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.
ईद, स्वातंत्र्य दिन, पोळा, मारबत, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, विधिमंडळ अधिवेशन व ३१ डिसेंबरपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त कायमच असतो. सणासुदीचे दिवस पाहता संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्थेसंबंधी राज्यस्तरावर तसेच परिमंडळ स्तरावर आढावा बैठका झाल्या असून त्यातील आदेश व सूचना पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास दिवसा वा रात्री नाकाबंदी करून संशयित ठिकाणी छापा टाकण्याचे आणि सुरक्षेची काळजी घेतली जात आहे किंवा नाही, याची जातीने तपासणी करण्याचे आदेशही त्या-त्या विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नागपूर शहर दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असल्याचे लपून राहिलेले नाही. यापूर्वी दोनवेळा दहशतवाद्यांच्या प्रयत्न फसला आहे. खामगाव, शेगाव, अकोला, बाळापूर, मालेगाव, वाशीम, अमरावती, वरुड, मोर्शी, कामठी आदी संवेदनशील ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे. गर्दीची ठिकाणे विशेषत: बाजारपेठा वा धार्मिक स्थळे दहशतवाद्यांची टार्गेट ठरली आहेत.
गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे पोलिसांना सजग राहण्याच्या, साध्या वेषातील पोलिसांना ठिकठिकाणी डोळ्यात तेल घालून पहारा तसेच संवेदनशील वस्त्यांमध्ये विशेष काळजी घेण्याच्या सूचना आहेत. स्थायी बंदोबस्ताची आखणी सुरू असून आवश्यक तेथे वाढीव बंदोबस्त दिला जाणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्ती पथके तयार करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी जाऊन ते आकस्मिक तपासणी करतील. दर तासागणिक त्यांना तपासणी करावण्याच्या सूचना आहेत. बॉम्बशोधक व नाशक तसेच श्वान पथकांना गर्दीच्या ठिकाणी तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कमांडो पथक, राज्य राखीव पोलीस दल, गृहरक्षक दल, एनसीसी कॅडेट्सची मदत घेतली जाणार आहे. वाहतूक पोलिसांनाही गर्दीच्या ठिकाणी तैनात केले जाणार आहे.
सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून संबंधित मंडळे वा संस्थांनाही सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. प्रदर्शनात अथवा विविध देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते.
आतमध्ये प्रवेश करताना मेटल डिटेक्टरने तपासणी करण्याचे आदेश असून सार्वजनिक मंडळे वा संस्थांनी शक्य असल्यास ती खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शक्य तेवढे सीसी कॅमेरे लावण्याचा आग्रहही केला जात आहे. सर्वच ठिकाणी पोलीस तैनात करणे शक्य नसून सार्वजनिक मंडळे अथवा संस्थांनी खासगी सुरक्षा रक्षक ठेवण्याच्या सूचना पोलिसांकरवी दिल्या जात आहेत. त्यांना पुरेसे प्रशिक्षणही दिले जावे, असा पोलिसांचा आग्रह आहे. स्वयंसेवकांना ओळखपत्रे देण्यास सांगण्यात आले आहे. स्थापना वा विसर्जन मिरवणुकीची वेळ व मार्ग याची आधीच माहिती घेतली जात असून गरज भासल्यास मार्ग बदलण्याच्या सूचना आहेत.