संपूर्ण महाराष्ट्रात आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार आता बॅंकेतून एकाच वेळी पाच लाखाच्या वर व्यवहार करण्यावर र्निबध घातले आहेत. पाच लाख रुपये काढणे किंवा भरणा करायचा असल्यास त्याची संपूर्ण माहिती बॅंकेकडे भरून द्यावी लागणार आहे. या व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर विभागाचे दोन अधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे, तसेच उष्माघातात कुण्याही मतदार, कार्यकर्त्यांचा, उमेदवाराचा घात होऊ नये याची सुध्दा काळजी घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होता कामा नये, तसेच इतरही गैरप्रकाराला आळा बसवा म्हणून बुलढाणा लोकसभा मतदासंघात २१ फिरते पथके तयार करण्यात आली आहेत. निवडणुकीत अलिशान मोटार गाडय़ांतून होणाऱ्या रकमेची, तसेच शस्त्रांची कडक तपासणीही पथके करणार आहेत. या मतदारसंघात १० एप्रिलला निवडणूक होणार आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदासंघनिहाय तपासणी पथके तयार करण्यात आली आहेत. निवडणूक उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये दाखल होणाऱ्या वाहनांसोबतच शहरातील मुख्य रस्त्यांवरून फिरणाऱ्या वाहनांची कडक तपासणी निवडणुकीपर्यंत केली जाणार आहे. निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये, यासाठी कडक निर्देश तपासणी पथकांना देण्यात आले आहे. विधानसभा मतदासंघातील प्रत्येक मुख्य रस्त्यावर प्रत्येकी पाच जणांचा समावेश असलेली पाच पथके तैनात करण्यात आली आहेत. यात पथकप्रमुख, वरिष्ठ पोलिस अधिकारी, हेड कॉंस्टेबल, शास्त्रधारी कर्मचारी, व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे.
तसेच निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर अ‍ॅम्बुलन्सचीही सोय करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळाव्यात म्हणून डॉक्टरांच्या पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील संवेदनशील मतदान केंद्रांची पडताळणी सुरू आहे. संवेदनशील मतदान केंद्र निश्चित करण्यासाठी पाच निकष आहेत.
ज्या केंद्रांमध्ये ७५ टक्के पेक्षा कमी मतदार फोटो आहेत असे केंद्र ज्या केंद्रात गुंडांची दहशत आहे आणि दहशतीने लोकांना मतदानापासून वंचित केले आहे. मतदानाची टक्केवारी खूप कमी आहे. त्याचबरोबर ९० टक्केहून अधिक मतदान झाले आहे व ज्या केंदावर एकाच उमेदवाराला ७५ टक्क्याहून अधिक मतदान झाले आहे, अशा ठिकाणी संवेदनशील मतदान केंद्र जाहीर करण्यात आले आहे.