महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी दि. १६ ला सकाळी १० वाजता सुरू होणार असून, साधारणपणे अर्धा ते पाऊण तासात पहिला निकाल जाहीर होईल. दुपारी १ वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती मनपाचे सहायक आयुक्त संजीव परसरामी यांनी दिली.
मनपा निवडणुकीसाठी येत्या रविवारी (दि. १५) मतदान होणार आहे. पुढच्या दिवशी सोमवारी (दि. १६) मतमोजणी होणार आहे. नागापूर औद्योगिक वसाहतीतील राज्य वखार महामंडळाच्या दोन गोदामांमध्ये मतमोजणी होणार असून, सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मोजणीची प्रक्रिया सुरू होईल, ती दुपारी १ वाजेपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज असून त्यादृष्टीनेच मनपा प्रशासनाने नियोजन केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर एखाद्या प्रभागाची मतमोजणी मतदानानंतर लगेचच करण्याचा विचार सुरू होता. राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त नीला सत्यनारायण यांनीच तशा सूचना दिल्या होत्या. मात्र पोलीस व मनपा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्याबाबत असमर्थता दर्शवल्याने ही गोष्ट नाकारण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच दिलेल्या नकाराधिकारानुसार (नॉट ऑफ अबव्ह- नोटा) यंदा मतदान होणार आहे. प्रत्येक प्रभागातील जागानिहाय त्यासाठी या यंत्रावर स्वतंत्र बटणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक यंत्रावरील शेवटचे बटण ‘नोटा’चे असेल. या मतांचा नकालावर कोणताही परिणाम होणार नसला तरी प्रभागनिहाय ही मते जाहीर करण्यात येणार आहेत.
दरम्यान, प्रशासनाची मतदान व मोजणीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आचारसंहिता भंगाच्या ९१ तक्रारी आत्तापर्यंत दाखल झाल्या असून त्यावर कार्यवाही सुरू आहे.