जानेवारी महिन्यात धनकवडी येथील वक्रतुंड सोसायटीत झालेल्या एका महिलेच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. संपत्तीच्या वादातून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने स्वत:च्याच मुलीच्या खुनाची सुपारी दिल्याचे उघड झाले असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
सुनीता कांबळे (वय ४३, रा. वक्रतुंड सोसायटी, धनकवडी, पुणे.), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. भीमराव ग्यानबा कांबळे (रा. वक्रतुंड सोसायटी), कलप्पा उर्फ कल्याणी शंकर कुट (वय ४३, रा. मिरा रस्ता, ठाणे), बाबासाहेब शंकर कुट (वय ४६, रा. पिंपळगाव खुर्द, ता. कागल, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्याचप्रमाणे सुनीता यांची बहीण सीमा कांबळे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमराव कांबळे हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. वक्रतुंड सोसायटीमध्ये ही महिला वडिलांसोबत राहत होती.
मात्र, वडील कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला होता. या खुनाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांनी कुट बंधूंना २९ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता सदनिकेच्या मिळकतीवरून मयताचे वडील भीमराव व छोटी बहीण सीमा कांबळे यांच्या सांगण्यावरून हा खून केला. हा खून सदनिकेच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे.