कोवळे वय, अनाथपण आणि त्यातही जगाचे भान नसलेले गतिमंदत्व हे त्या मुलींचे प्राक्तन. आपली काळजी कोणी घ्यावी हे त्यांच्या हातात नव्हते. मग काळजी घेणारा योग्य प्रकारे घेतो आहे की नाही हे ठरवणे त्यांच्या हाती कसे असणार? या मुलींची काळजी ज्यांनी घेणे अपेक्षित होते तेच मुलींच्या जिवावर उठले. तेच त्यांच्या शरीराचे लचके तोडत होते. ते सुद्धा अतिशय अमानवी पद्धतीने. यथावकाश निसर्गाने आपले काम केल्यावर प्रकरण उघडकीस आले. या चिमुकल्या मुलींना बोलते करणे मोठे आव्हान होते. कशाबशा त्या बोलल्या आणि त्या पुराव्यांच्या जोरावर सहा आरोपींना शिक्षा झाली. त्यानंतर या मुलींचे उच्च न्यायालयाच्या आदेशाने पुर्नवसन करण्यात आले. आता त्या निर्धोक आणि सुरक्षित जीवन जगतील, अशी अपेक्षा होती.. पण.. पण तिथेही यातील दोन मुली लैंगिक शोषणाला बळी पडल्या. बलात्कारानंतर दोषींना शिक्षा झाल्यानंतर त्याच पीडितांवर पुन्हा बलात्कार होण्याची ही विरळा घटना.
मानखुर्द येथील वसतीगृहातील दोन अल्पवयीन गतिमंद मुलींवर शाळेतील शिपायानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. सगळ्यात भीषण बाब म्हणजे ज्या मुलींवर हे अत्याचार झाले त्या कवडास आश्रमातील बलात्कार कांडातील पीडित मुली होत्या. या मुली अनाथ होत्या आणि कवडास येथील मुलींच्या आश्रमात राहात होत्या. तेथील आश्रम चालक आणि शिक्षकांनी २०१० मध्ये या अल्पवयीन मुलींवर अनन्वित लैंगिक अत्याचार केले होते. त्यांना बोलता येत नव्हते, काय होत होते हे त्यांना कळत नव्हते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. या मुलींवर अत्याचार झाल्याचे पुरावे नव्हते. त्या अनाथ असल्याने त्यांच्या बाजूने लढणारे कुणी नव्हते. त्या गतिमंद असल्याने त्यांना आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कैफियत मांडता येत नव्हती.
चौकशी समितीने मुलींचे समुपदेशन करून त्यांना बोलते केले. बचाव पक्षाने आरोपींना वाचविण्यासाठी या मुलींवर प्रचंड दबाव आणला. कसलेल्या वकिलांनी या मुलींना न्यायालयात उलटसुलट प्रश्न विचारून भांबावून सोडले होते. परंतु तरीही त्या आपल्या भाषेत न्यायालयासमोर बोलल्या. त्यांना बलात्कार झाला हे सांगता आले नाही. पण शरीराचे कसे हाल केले जात होते हे त्यांनी सांगितले आणि त्याच जबानीवर या वासनाकांडातील सहा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले. त्यातील एकाला फाशी, दोघांना जन्मठेप आणि दोघांना दहा वर्ष तर एकाला एक वर्षांची सजा ठोठावली गेली.
या घटनेनंतर त्यांना मानखुर्द येथील सुधारगृहात पुनर्वसनासाठी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर त्या आता सुरक्षित राहतील, अशी अपेक्षा होती. पोलिसांच्या बंदोबस्तात त्या शाळेत जात होत्या. पण त्या आगीतून फुफाटय़ात पडल्या होत्या. कारण या शाळेतील शिपायानेच दोन अल्पवयीन मुलींवर तीन महिने बलात्कार केला. बलात्कार करणाऱ्यांना दोषींना शिक्षा झाल्यानंतर पीडिता पुन्हा बलात्काराला बळी पडण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी.
राजेश तरे या शिपायाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या मुली कवडासच्या वासनाकांडातील पीडित आहेत आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना शिक्षा झाली हे त्याला माहीत होते. तरी त्याने हा गुन्हा केला. गतिमंद मुलींना न्यायालयात बोलते करणे मोठे आव्हान होते. त्यात आम्ही कसबसे यशस्वी झालो आता पुन्हा त्यांना कसे बोलते करणार, असा प्रश्न कवडास वासनाकांडाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने केला. त्या एका भीषण अवस्थेतून गेल्या होत्या. पुन्हा तसाच प्रसंग त्यांच्यावर ओढवला. त्यामुळे त्या आता पुरत्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यांच्या मानसिक अवस्थेची कल्पनाच न केलेली बरी, अशी खंतही या अधिकाऱ्याने व्यक्त केली. यापुढील काळात तरी त्यांच्या सुरक्षेची हमी काय, असा सवाल आता निर्माण झाला आहे.