शहर आणि महानगरपालिका स्तरावर अबाधित वर्चस्व राखणाऱ्या शिवसेनेला मनपाच्या या निवडणुकीत नामुष्कीचाच सामना करावा लागत आहे. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या शहराच्या मध्य भागातीलच बहुसंख्य जागा मित्र पक्ष भारतीय जनता पक्षाकडे गेल्याने हा चिंतेचा विषय बनला असून त्यासाठी शहरप्रमुख संभाजी कदम यांनाच जबाबदार धरण्यात येत आहे.
शहरात गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेचा आमदार आहे. अलिकडच्या काळात मनपावरही शिवसेनेचेच वर्चस्व आहे. या पाश्र्वभूमीवर मनपा निवडणुकीत पक्षाला विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येते, त्याबद्दल कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. धाडगे यांनी याबाबत कदम यांच्यावर थेट तोफ डागली असून याबाबत पक्षश्रेष्ठींनाही निवेदन पाठवले आहे. त्यांनीच ही माहिती दिली.
धाडगे यांनी सांगितले, की शहराचा मध्यवर्ती भाग हे शिवसेनेचे बलस्थान आहे. येथूनच शिवसेनेने शहरात पाय रोवले. विधानसभेलाही हाच भाग बहुमताने पक्षाच्या बरोबर राहिला, मात्र मनपाच्या या निवडणुकीत येथेच पक्षाची मोठी पीछेहाट झाली असून मित्रपक्ष भाजपने तहातच शिवसेनेसमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. मुख्यत: बाजारपेठा व दाट लोकवस्ती असलेल्या या तीन प्रभागात म्हणजे सहा जागांवर शिवसेनेची मोठी नामुष्की झाली आहे. प्रभाग १८ (तोफखाना), प्रभाग २० (माणिक चौक) आणि प्रभाग २३ (माळिवाडा) या मोठय़ा भागात पक्षाला ही पीछेहाट स्वीकारावी लागणार आहे. यातील १८ आणि २० या दोन्ही प्रभागातील चारही जागा भाजपला सोडण्यात आल्या आहेत. बाळासाहेब बोराटे यांच्या कोलांटउडीमुळे प्रभाग २३ मधील एका जागेवरही पक्षाचा उमेदवारच नाही.
या सगळ्या गोष्टींचा विचार करता माळीवाडय़ापासून ते थेट सर्जेपुऱ्यापर्यंत शिवसेनेचे चिन्हच निवडणूक रिंगणात नाही ही गोष्ट धाडगे यांनी निदर्शनास आणून दिली. पक्षाच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब असून त्याचे दूरगामी परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. या सगळ्या गोष्टींना शहरप्रमुख संभाजी कदम हेच जबाबदार आहेत असा थेट आरोप त्यांनी केला. प्रभाग २३ हा त्यांचाच प्रभाग आसून बोराटे यांनी ऐनवेळी पक्षाची अडचण केली, याचा कदम यांना थांगपत्ताही लागू शकला नाही, ही साधी गोष्ट नाही. स्वत:चा प्रभाग तर त्यांना अभेद्य ठेवता आला नाहीच, मात्र मध्यवर्ती भागातील बालेकिल्ल्यातही त्यांना योग्य व्यूहरचना करता आली नाही असे धाडगे म्हणाले.
शिवसेनेत या गोष्टीवरून वादंग पेटले असतानाच चार प्रभागांत त्यांना उमेदवारही देता आले नाही, याचीही शहरात चर्चा होत आहे. युतीच्या जागावाटपात पक्षाच्या वाटय़ाला ३६ जागा आल्या असून त्यातील ३२ जागांवरच पक्षाने उमेदवार दिले आहेत. चार जागांवर त्यांना उमेदवारच मिळू शकले नाही याकडे शहरात नामुष्की म्हणूनच पाहिले जात आहे.
कदम यांच्या राजीनाम्याची मागणी
या सगळ्या गोष्टींना सतीश यांनी पक्षाचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनाच जबाबदार धरले आहे. ही जबाबदारी स्वीकारून त्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा श्रेष्ठींनीच तो घ्यावा अशी मागणी त्यांनी केल्याने ही धुसफूस चव्हाटय़ावर आली आहे. ऐन निवडणुकीतच त्याला तोंड फुटल्याने पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे.