मांजरा परिवाराच्या साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन दोन हजार ते एकवीसशे रुपयांपर्यंत ‘एफआरपी’प्रमाणे भाव दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर मनसेने ऊसभावप्रश्नी सुरू केलेले आंदोलन बुधवारी रात्री मागे घेण्यात आले. मनसेचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके व संतोष नागरगोजे यांनी ही माहिती दिली.
शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता १ हजार ८०० रुपये दिला जात आहे. सरकारच्या नियमानुसार ‘एफआरपी’प्रमाणे मिळणाऱ्या साखर उताऱ्यानुसार दोन हजार ते दोन हजार शंभर रुपयांपर्यंत भाव दिला जाणार आहे. मनसेने ऊसदरासाठी सुरू केलेले आंदोलन त्वरित मागे घ्यावे, असे पत्र मांजरा परिवारातर्फे आमदार दिलीपराव देशमुख यांनी दिले. ते मिळताच आंदोलन मागे घेत असल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, आंदोलनामुळे शेतकऱ्यांना या वर्षी दीडशे कोटींचा फायदा होईल, असा दावाही करण्यात आला आहे.
मांजरा परिवाराशिवाय जिल्हय़ात सुरू असलेल्या सिद्धी, पन्नगेश्वर आदी कारखान्यांनी आपले म्हणणे त्वरित जाहीर करावे, अन्यथा त्यांचे कारखाने चालू देणार नसल्याचा इशाराही पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.