विधी शाखेतील विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णत्वास गेली. तसेच ज्यांना उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती मिळाल्या नाहीत, त्यांना १६ ऑगस्टपर्यंत त्या दिल्या जाणार असून पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.
या बाबतची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष चिन्मय गाढे यांनी दिली. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाचे अर्ज भरताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. या संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राशी संपर्क साधून त्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर विद्यापीठात दूरध्वनीवरून संपर्क साधून यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. या संदर्भातील निवेदन कुलगुरूंना पाठविण्यात आले. ऑनलाइन पुनर्मूल्यांकन अर्ज भरण्याची मुदत १० ते १७ ऑगस्ट २०१४ अशी आहे. परंतु हे अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध झाले नव्हते. अर्ज भरण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत जे पासवर्ड व युजरनेम टाकून लॉगइन केले होते, तेच भरण्याची आवश्यकता असते. परंतु तेच पासवर्ड व युजरनेम लॉगइन करूनही हे अर्ज भरले जात नव्हते. तांत्रिक कारणांमुळे निर्माण झालेला हा
गोंधळ गाढे यांनी उपकेंद्रातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणला.
त्यानंतर विद्यापीठाशी संपर्क साधून या सर्व विद्यार्थ्यांना दुबार पासवर्ड व युजरनेम देण्यात आले. त्यानंतर संबंधितांची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णत्वास गेली. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज केले होते, अशा विद्यार्थ्यांना संपूर्ण विषयाच्या छायाप्रती मिळाल्या नाहीत. त्यांना १६ऑगस्टपर्यंत उर्वरित छायाप्रती देऊन हे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. याबाबतची माहिती गाढे यांनी दिली.