महसूल विभागातील वरिष्ठांची अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाजाबरोबरच रामटेक लोकसभा निवडणुकीवरही परिणाम होणार असल्याची चिंता कास्ट्राईब कर्मचारी महासंघाला वाटत आहे.
विभागीय आयुक्तानंतर अपर आयुक्तपद असून भारतीय प्रशासन सेवेतील ते महत्त्वाचे पद मानले जाते. या पदावर असलेले आनंद भरकाडे गेल्यावर्षी जूनमध्ये सेवानिवृत्त झाले. या पदाचा अतिरिक्त प्रभार उपायुक्त (करमणूक) संजयसिंह गौतम यांच्याकडे आहे. उपायुक्त (महसूल) हेही दुसरे महत्त्वाचे पद आहे. हे पद गेल्या एक वर्षांपासून रिक्त आहे. या पदावरील अरुण डोंगरे यांची अमरावती महानगरपालिकेत आयुक्त म्हणून बदली झाल्यामुळे या पदाचा अतिरिक्त प्रभार सध्या उपायुक्त (पुनर्वसन) डी.एस. चिलमुलवार यांच्याकडे आहे. त्यानंतर उपायुक्त (सामान्य) हे महत्त्वाचे पद असून गेल्या एक वर्षांपासून ते रिक्त आहे. पदावर राजीव जवळेकर होते परंतु त्यांची बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाल्याने गेल्या १० महिन्यापासून पद रिक्त आहे. सध्या या पदाचा अतिरिक्त प्रभार उपायुक्त (विकास) अनिल नवाळे यांच्याकडे आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील मोठय़ा प्रमाणआत उपायुक्त पदाची रिक्त पदे असल्याने प्रशासकीय व कार्यालयीन कामे निकाली काढण्यास विलंब होत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना वरिष्ठांची नाराजी पत्कराली लागत असल्याचे कास्ट्राईब जिल्हाध्यक्ष सोहन चवरे यांनी निदर्शनास आणून दिले.
रामटेक लोकसभा निवडणुकीवरही त्या रिक्त पदांमुळे परिणाम होणार असल्याचे संघटनेचे ठाम मत आहे. नागपूर जिल्ह्य़ात दोन लोकसभा मतदारसंघ असून नागपूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी सौरभ राव आहेत तर दुसरा महत्त्वाचा रामटेक हा लोकसभा मतदारसंघ संघ आहे. या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी राहणार असून सध्या हे पद रिक्त आहे. २००९ मधील रामटेक लोकसभा निवडणुकीत निर्णय अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी धीरजकुमार होते. परंतु त्यांची २०१०मध्ये बदली झाल्यापासून गेल्या चार वर्षांपासून ते पद रिक्त आहे. सध्या या पदाचा अतिरिक्त भार उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) आशा पठाण यांच्याकडे आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास जेमतेम एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. महसूल विभागातील महत्त्वाची पदे तात्काळ भरण्याची मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे आणि जिल्हाध्यक्ष सोहन चवरे यांनी केली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त संजयसिंह गौतम यांच्याकडे एक दोन नव्हे तर तब्बल सहा पदे आहेत. त्यांच्याकडे उपायुक्त(करमणूक), अपर आयुक्त (भाप्रसे), उपायुक्त (सामान्य), जात वैधता पडताळणी समिती क्रमांक एक, दोन आणि तीनचे अध्यक्ष अशा सहा पदांचा कारभार ते सांभाळतात.