अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे जिल्हय़ात या वर्षी ५१८ नवीन परवाने, तसेच ८ हजार ८०० नोंदणी झाली. यातून ७१ लाख ३५ हजार ९७० रुपयांचा महसूल जमा झाला.
जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बठक झाली. या वेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अ. गो. भुजबळ यांनी अन्नसुरक्षा अधिनियमाची प्राथमिक माहिती दिली. आडत व्यापारी, किराणा व्यापारी, दूधउत्पादक, मिठाई व भाजीपाला विक्रेते, वितरक यांच्या बठका घेऊन कायद्याविषयी माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तपासासाठी घेतलेल्या १०९ नमुन्यांपकी १० नमुने अप्रमाणित आढळून आले. पकी २ असुरक्षित व ८ कमी दर्जाचे आहेत. असुरक्षित अन्न नमुन्यांबाबत न्यायालयात खटला दाखल झाला. चार प्रकरणांत न्यालयाच्या निर्णयानुसार संबंधितांना ६१ हजारांचा दंड ठोठावण्यात आला, तर २ प्रकरणांत साडेसात हजार रुपये शुल्क वसूल करण्यात आले.
अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्हय़ात विविध ठिकाणी मोहिमा राबविल्या. विक्रेत्यांकडून ४७ लाख रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू आदी जप्त करण्यात आले. या प्रकरणी ६ खटले दाखल केल्याची माहिती विभागाच्या सचिवांनी दिली.