पिंपरी पालिकेने २०१३-१४ या आर्थिक वर्षांसाठी प्रस्तावित केलेल्या मिळकतकर वाढीचा प्रस्ताव सत्ताधारी राष्ट्रवादी व आयुक्त यांच्या संघर्षांत स्थायी समितीत चार आठवडे अडकला होता. आता स्थायी समितीने तिरकी चाल खेळत करवाढ मंजूर करून नागरिकांचा रोष ओढावून घेण्यापेक्षा तो प्रस्ताव मान्यतेसाठी महापालिका सभेत पाठवला आहे. दरम्यान, आयुक्तांना तातडीच्या बैठकीसाठी जावे लागल्याने नवीन गावांसाठी होणारी आजची महत्त्वाची बैठक लांबणीवर पडली.
स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करवाढीचे विविध प्रस्ताव होते. तथापि, नागरिकांचा रोष टाळण्याच्या हेतूने स्थायीने मिळकतकर वाढीचा प्रस्ताव फेटाळून लावला. तर, जकात समानीकरणाचा निर्णय पालिका सभेने घ्यावा, अशी शिफारस केली. तथापि, आकाशचिन्ह परवाना करात १० टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली. याबाबतचे अंतिम निर्णय पालिका सभेत होणार असून त्यानंतर आयुक्त आपल्या अधिकारात करवाढीची अंमलबजावणी करणार का, याकडे सर्वाचे लक्ष आहे. दरम्यान, पालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये जादा तरतूद करण्यासाठी आयोजित महत्त्वपूर्ण बैठक आयुक्त नसल्याने होऊ शकली नाही. या बैठकीसाठी केवळ पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आल्याने गावांमधील नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी होती. बैठकच न झाल्याने या नाराजीत आणखीच भर पडली.
माजी महापौरांच्या बैठका सुरू
यापूर्वीचे महापौर योगेश बहल यांनी खंडित केलेली माजी महापौरांच्या बैठकीची परंपरा महापौर मोहिनी लांडे यांनी वर्षभराच्या कालावधीनंतर मंगळवारी पुन्हा सुरू केली. मात्र, बैठकीस अल्प प्रतिसाद मिळाला. आजच्या बैठकीत माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, माजी महापौर हनुमंत भोसले, कविचंद भाट, संजोग वाघेरे, मंगला कदम, अपर्णा डोके उपस्थित होते.