तालुक्यातील जनावरांच्या सहा छावण्या तपासणीत त्रुटी आढळल्याने बंद करण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज दिले. महसूल विभागाने केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. यातील तीन छावण्यांचे चालक राष्ट्रवादीशी व तीन काँग्रेसशी संबंधित आहेत.
जिल्ह्य़ात सुरू असणाऱ्या छावण्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भरारी पथकाची नेमणूक केली आहे. त्यानुसार जिल्ह्य़ात सर्वाधिक छावण्या असणाऱ्या कर्जत तालुक्यात या पथकाने दि. ५ला पाहणी केली होती. जनावरांना लावलेले बिल्ले, नियमाप्रमाणे मिळणारा चारा, रजिस्टर नोंदणी व त्याप्रमाणे जनावरांची उपस्थिती या निकषांची पाहणी पथकाने तपासणीत केली.
यामध्ये गायकरवाडी येथील सिद्धीविनायक महिला सहकारी संस्था, सोनाळवाडी येथील अंबिका महिला दूध उत्पादक संस्था, टाकळी खंडेश्वरी येथील स्थापलिंग मजूर सहकारी संस्था, बारडगाव दगडी येथील एकनाथ पाटील ग्रामीण विकास संस्था, दूरगाव येथील नेताजी सुभाषचंद्र वाचनालय व अंबिजळगाव येथील सानेगुरूजी सार्वजनिक वाचनालय या सहा संस्थांच्या छावण्यांमध्ये पथकाला काही त्रुटी आढळल्या. याचा अहवाल पथकाने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर आज या सहा छावण्या बंद करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी छावणीचालकांना दिले.
हे छावणीचालक राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे नेतेमंडळी आहेत. त्यांच्याच छावण्यांवर कारवाई झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याशिवाय तालुक्यात काही छावण्या कमिशन घेऊन चालवित असून आता त्यांच्यावर काय कारवाई होणार, अशी चर्चा सुरू आहे.     
कदम यांचा इशारा
दरम्यान, बारडगाव दगडी येथील जयसिंग कदम यांनी यापूर्वी एकनाथ पाटील ग्रामीण संस्थेने चारा डेपोत गैरव्यवहार केल्याची तक्रार केली होती. या कारवाईमुळे ती योग्यच होती हे सिद्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तपासणीत तेथे गुरे कमी आढळली. त्यामुळे या संस्थेचे मागील पेमेंट देऊ नये, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा कदम यांनी निवेदनात दिला आहे.