नवी मुंबई पालिकेचा अर्धा भाग असलेल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातील तरुणाई, पाच वर्षांत वाढलेली मतदार नोंदणी आणि केवळ विकासाला महत्त्व देणारे मतदार निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या मतदारसंघात आमदार संदीप नाईक यांची कसोटी लागणार असून शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले यांची ही तिसरी परीक्षा होणार आहे. याशिवाय भाजपचे वैभव नाईक यांच्याकडे मतांचे ‘वैभव’ किती आहे याची चाचपणी होणार असून आघाडी असताना दोनपैकी एका मतदारसंघाची मागणी करणाऱ्या काँग्रेसची ताकद किती आहे ते रमाकांत म्हात्रे यांच्या उमेदवारीमुळे स्पष्ट होणार आहे. याशिवाय मनसेचे गजानन खबाळे व उद्योजक अपक्ष उमेदवार के. आर. गोपी आपले नशीब आजमवणार आहेत.
नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघ शहर, ग्रामीण, आणि झोपडपट्टी अशा नागरी वसाहतीत विभागलेले आहेत. त्यात ऐरोली मतदारसंघात ग्रामीण आणि झोपडपट्टी भाग जास्त असल्याने या संघातील चुरस रंगतदार होणार आहे.
मंत्री पुत्र राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी या भागाचा केलेला समतोल विकास हा त्यांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा आहे. ‘होय, आपण विकास केला आहे आणि यापुढेही करणार’ असे घोषवाक्य घेऊन ते मतदारांना सामोरे जात आहेत. मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी लागणारा वाढीव एफएसआयचा प्रश्न सुटल्याची हमी दिली जात आहे. जॉब फेअर, सराव परीक्षा, वर्षभर चालणारे रोजगार केंद्र, क्रीडा महोत्सव आणि पर्यावरण व सांस्कृतिक संवर्धन हे त्यांच्या प्रचारातील मुद्दे आहेत. त्यांच्यासमोर घराणेशाही, वाढीव एफएसआयचे गाजर, आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा, शाळांची फीवाढ, डम्िंपग ग्राऊंड, अस्वच्छता, पालिकेतील तथाकथित भ्रष्टाचार हे मुद्दे महत्त्वाचे मानले जात आहेत. मागील निवडणुकीत नाईक विरुद्ध चौगुले ही लढत झालेली आहे. त्यात चौगुले याचा १२ हजारांनी पराभव झालेला होता, पण त्यावेळी युती अस्तित्वात होती. ऐरोली हा तसा शिवसेनेला तारणारा भाग आहे पण घणसोली, कोपरखैरणे, बोनकोडे येथे राष्ट्रवादीचे वर्चस्व यापूर्वी सिद्ध झाले आहे. मतदारसंख्येत झालेली ८१ हजारांची वाढ, तरुणाई आणि विकासालाच प्राधान्य देणारे बौद्धिक मतदार या मतदारसंघाचे भवितव्य ठरविणार आहेत.

मतदारसंघातील समस्या मार्गी लावण्याचा गेली पाच वर्षे प्रामाणिक प्रयत्न केला आहे. दिलेला शब्द पाळला आहे. तरुणांची संख्या जास्त असल्याने ३६५ दिवसांचे रोजगार केंद्र सुरू करण्यात आले असून हजारो तरुणांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय शिक्षण, क्रीडा क्षेत्राला महत्त्व दिलेले आहे. झोपडय़ांचा पुनर्विकास आणि प्रत्येक हाताला काम हे आपले ध्येय आहे. अनुभवी नागरिक आणि स्वयंसेवी संस्था यांचे यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यात आले आहे. मतदारांना चांगले आणि वाईट, योग्य आणि अयोग्य याची जाण आहे. ऐरोलीतील वातावरण दहशतमुक्त आणि शांततामय राखण्यासाठी मतदार सुशिक्षित उमेदवार म्हणून मला पुन्हा निवडून देतील याची खात्री आहे.
संदीप नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>

नाईक फॅमिलीने नवी मुंबईकारांची केवळ दिशाभूल केली आहे. एफएसआयचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. टोलमुक्त ऐरोली, मेटेन्स फ्री, टॅक्स फ्री, गॅस फ्री इमारत पुनर्विकास, बैठी घरे व रोऊसेसनाही पुनर्विकासाची संधी, शाळेतील वाढलेले शुल्क, पालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांचा तुटवडा, झोपडपट्टी पुनर्विकास, धार्मिक स्थळ नियमित करणे, तुर्भे येथील डम्िंपग ग्राऊंडचे स्थलांतर यासारखे प्रश्न घेऊन ही निवडणूक मी लढत आहे आणि यावेळी विजयाची खात्री आहे.
विजय चौगुले, शिवसेना</strong>

उमेदवार
राष्ट्रवादी – संदीप नाईक * शिक्षण – पदवीधर ल्ल मालमत्ता- जंगम- ९ कोटी ४१  लाख ३७ हजार ९६०. स्थावर – ९ कोटी ७३ लाख ८८ हजार १६० रुपये.  
शिवसेना – विजय चौगुले * शिक्षण – विजय चौगुले  * मालमत्ता- जंगम- ३८ लाख १६ हजार ६०१ स्थावर – ३ कोटी ७६ लाख ८७ हजार ७२० रुपये
भाजप -वैभव नाईक  ल्ल शिक्षण – बारावी  * मालमत्ता- जंगम-६ कोटी ४२ लाख ८३ हजार १०८ रुपये स्थावर – ४ कोटी ५९ लाख २० हजार रुपये.
काँग्रेस – रमाकांत म्हात्रे *  शिक्षण – अकरावी, * मालमत्ता – जंगम – ९ कोटी ५८ लाख, स्थावर – ९५ लाख ४० हजार रुपय
मनसे- गजानन खबाळे – शिक्षण – सातवी ल्ल मालमत्ता- जंगम-७२ लाख ५३ हजार ३०० रुपये. स्थावर – १६ कोटी २४ लाख रुपये.