देशात एके काळी सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा बेलापूर मतदारसंघ छोटा झाल्यानंतर होणारी ही दुसरी निवडणूक मोठी रंगतदार ठरणार असून सहा महिन्यांवर आलेल्या पालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट करणारी आहे. राज्यातील एक वजनदार राजकीय नेतृत्व असलेल्या गणेश नाईक यांचा सामना एकाच वेळी त्यांच्या पक्षातून फुटलेल्या भाजपच्या मंदा म्हात्रे व शिवसेनेचे मुंबईहून आयात केलेले नेते, पालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटा यांच्याबरोबर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले असून नाईक शहरात केलेल्या विकासाचा मुद्दा मांडत असून विरोधकांचे घराणेशाही, भ्रष्टाचार आणि फसवणूक हे मुद्दे अग्रस्थानी आहेत. वाशी, बेलापूरमधील मतदार कोणत्या मुद्दय़ांना महत्त्व देतात ते पुढील आठवडय़ात ठरणार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपच्या या लढतीत काँग्रेसचे नामदेव भगत व मनसेचे गजानन काळे हेदेखील दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो का ते पाहणार आहेत. नवी मुंबई पालिकेत नाईक यांची गेली वीस वर्षे एकहाती सत्ता आहे. त्यामुळे राज्यात आघाडीतील बिघाडी आणि युतीचा घटस्फोट आज जरी झाला असला तरी स्वतंत्र लढतीचे हे प्रयोग नवी मुंबईत गेली वीस वर्षे केले जात आहेत. त्यात प्रत्येक पक्षाची ताकद स्पष्ट झाली आहे. लोकसंख्येने झपाटय़ाने वाढलेल्या ऐरोली मतदारसंघात वाढलेले ६७ हजार मतदार यावेळी निर्णायक ठरणार आहेत. मुंबई पालिकेनंतर स्वत:चे धरण असलेली पालिका, लक्षवेधी मुख्यालय, अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र, मुबलक पाणीपुरवठा, रस्त्यांची पुनर्बाधणी, अद्ययावत मनोरंजन केंद्र, उद्याने, विद्यार्थी टक्का राखून ठेवणाऱ्या अद्ययावत शाळा, आचारसंहितेच्या कचाटय़ात सापडलेली वाढीव एफएसआयची मंजुरी, प्रकल्पग्रस्तांच्या घरांना संरक्षणाची हमी, झोपडपट्टय़ांना दिलेल्या सुविधा यासारख्या विकासाच्या मुद्यांवर नाईक ही निवडणूक लढवीत आहेत. त्याविरोधात शिवसेनेचे उमेदवार नाहटा यांनी नाईकांची घराणेशाही, पालिकेतील टक्केवारी, अडीच एफएसआयवरून मतदारांची केलेली फसवणूक, व्यक्तिगत स्वार्थ, आयुक्त असताना शहरात केलेली कामे व शहर व्हिजन घेऊन मतदारांना समोरे जात आहेत. नाईकांशी दोन हात करण्यास उभ्या राहिलेल्या भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याकडे प्रकल्पग्रस्तांचे सोडवलेले प्रश्न, नाईकांची हुकूमशाही हे मुद्दे असून युती तुटल्याचा मोठा फटका त्यांना बसला आहे.

नवी मुंबई हे कॉस्मोपॉलिटिन शहर आहे. येथील जनतेला विकास, शांतता, आणि रोजगार हवा आहे. शहराचा सर्वागिण विकास करताना शहरात कोणत्याही प्रकारचे दंगे- धोपे होणार नाहीत याची काळजी राज्यकर्ते म्हणून घेण्यात आली आहे. रोजगाराच्या अनेक संधी येथील तरुणांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जात, पात, प्रांत, भेद याला आमच्याकडे थारा नाही. वीस वर्षे न वाढलेले मालमत्ता कर, पाणीदर ही आमची जमेची बाजू असून हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्याचा ध्यास आहे. येथील जनता सुशिक्षित आहे. विकासाचे मॉडेल घेऊन आम्ही पुढे जात आहोत.
गणेश नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेस

राज्य सरकारचे १५ वर्षांतील अपयश, भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचार यामुळे जनता या सरकारला विटलेली आहे. नवी मुंबईतील घराणेशाहीच्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार, आम्ही चव्हाटय़ावर आणणार आहोत. याशिवाय नवी मुंबई विमानतळ उभारणीला गती देणे, गावांसाठी सुधारित क्लस्टर योजना, एफएसआयची मंजुरी, एसआरए योजना, कंडोनियममधील बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करणे, प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची विक्री, मोरबे धरणाजवळ पर्यटनस्थळाचा विकास अशी विकास कामे करणार आहोत.
विजय नाहटा, शिवसेना</strong>

उमेदवार
राष्ट्रवादी – गणेश नाईक  *  शिक्षण – अकरावी ल्ल  मालमत्ता – ४ कोटी ६६ लाख २१ हजार ८२४ स्थावर – १० कोटी ९४ लाख दोन हजार रुपये ५६०
शिवसेना- विजय नाहटा *   शिक्षण – एलएल. बी. * मालमत्ता – जंगम – १ कोटी ३३ लाख २५ हजार ११ रुपये, स्थावर – ३ कोटी २४ लाख
भाजप- मंदा म्हात्रे *  शिक्षण – सातवी ल्ल मालमत्ता – ६ कोटी ९५ लाख ५ हजार ६४४ रुपये स्थावर – ८ कोटी ८५ लाख ३६ हजार ३०० रुपये
काँग्रेस- नामदेव भगत *  शिक्षण – दहावी, *  मालमत्ता – जंगम ६ कोटी ३९ लाख २५ हजार ९५६ रुपये स्थावर – २९ कोटी ८५ लाख ७९ हजार ९५६ रुपये
मनसे – गजानन काळे *  शिक्षण – बीए *  मालमत्ता – जंगम- १ कोटी ६ लाख१३ हजार ६८४ स्थावर – ४५ लाख रुपये