मुस्लीमबहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी पूर्व मतदारसंघात मराठी, तेलगू, उत्तर भारतीय, गुजराती आणि सिंधी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मानखुर्द आणि भिवंडी पूर्व या दोन्ही मतदारसंघांतून समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी निवडणूक लढविली होती आणि या दोन्ही मतदारसंघांतून ते विजयी झाले होते. त्यामुळे त्यांनी भिवंडी पूर्व मतदारसंघातील आमदार पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मतविभाजनाचा फायदा घेत शिवसेनेचे रुपेश म्हात्रे निसटत्या मताधिक्याने निवडून आले होते. यंदा या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे रुपेश म्हात्रे, भाजपतर्फे संतोष शेट्टी, समाजवादी पार्टीतर्फे अबू आझमी यांचे पुत्र फरहान, राष्ट्रवादीतर्फे मोहम्मद खलीद गुड्डू आणि काँग्रेसतर्फे मोहम्मद फजिल अन्सारी आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हा मतदारसंघ मुस्लीमबहुल असला तरी येथे शिवसेनेचे १४ नगरसेवक आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे रुपेश म्हात्रे, भाजपचे संतोष शेट्टी आणि सपाचे फरहान आझमी यांच्यात खरी लढत होणार असून यामध्ये रुपेश म्हात्रे यांचे पारडे जड असल्याचे दिसून येते. मात्र दोन दिवसांपूर्वी रुपेश म्हात्रे आणि संतोष शेट्टी यांच्यात झालेल्या हाणामारीमुळे या दोघांच्या मतांवर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा फायदा फरहान आझमी यांना होऊ शकेल, असा अंदाज आहे. कारण गेल्या निवडणुकीत फरहानचे वडील अबू आझमी या मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी, अवासी विकास पार्टी, एमआयएम आणि पीस पार्टीतर्फे मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या मतांचे विभाजन होऊन फरहान यांना फटका बसू शकतो आणि त्याचा फायदा शिवसेना किंवा भाजप उमेदवाराला होऊ शकतो, असाही अंदाज व्यक्त होत आहे. या मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात पॉवरलुम असून त्यांना सुविधा पुरविणे, विजेचे दर, चांगले रस्ते, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा अशा महत्त्वाच्या मुद्दय़ांवर या मतदारसंघात उमेदवार निवडणूक लढविताना दिसून येते.

* आशिया खंडातील सर्वात मोठा पॉवरलुम व्यवसाय म्हणून भिवंडी पूर्व मतदारसंघाची ओळख असून ती टिकून रहावी आणि या व्यवसायाला आणखी चालना मिळावी, यासाठी पॉवरलुम व्यवसायाला पूरक असलेले उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी गृहउद्योग सुरू करणार आहे. वाहतूक व्यवस्था सुधारणे, याशिवाय मतदारसंघात आवश्यक असणाऱ्या शासनाच्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
रुपेश म्हात्रे, शिवसेना</strong>

* औद्योगिक शहर म्हणून घोषित करून भिवंडीचा विकास करणार, पाणी योजनेत सुधारणा, सिमेंटचे रस्ते तयार करणे, महिलांसाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आणि त्यामध्ये महिला पोलीस बंदोबस्त पुरविणे, क्रीडासंकुल, सभागृह, कब्रस्तान आदी महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणार आहे. याशिवाय येथील नागरिकांना वीज बिले जास्त येऊ लागली आहेत. त्यामुळे त्यांच्या वीज मीटरचे ऑडिट करणार आहे.
फरहान आझमी, समाजवादी पार्टी</strong>

उमेदवार
शिवसेना- रुपेश म्हात्रे- शिक्षण- एस.वाय.बी.ए, मालमत्ता- जंगम- २ कोटी ७९ लाख ४७ हजार स्थावर- १ कोटी ८२ लाख.
समाजवादी पार्टी- फरहान आझमी शिक्षण- एचएससी, मालमत्ता- जंगम- १४ कोटी ४९ लाख ७६ हजार ७७४ स्थावर- ३८ कोटी ८० लाख ७६ हजार ८००.
भाजपा- संतोष शेट्टी- शिक्षण- ८ वी, मालमत्ता- जंगम- १ कोटी ७२ लाख ६९ हजार ७०९ स्थावर १ कोटी २८ हजार