ठाण्याचा पूर्वेकडील भाग अर्थात कोपरी परिसर आणि पश्चिमेकडील वागळे परिसराचा समावेश असलेला कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ गेली अनेक दशके शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. सर्वधर्मीय मतदार वास्तव्यास असून अन्य मतदारांच्या तुलनेत मराठी, सिंधी, उत्तर भारतीय, मुस्लीम समाजाच्या मतदारांची मोठी संख्या या मतदारसंघात आहे. असे असतानाही शिवसेनेने या भागात स्वत:चा वरचष्मा राखल्याचे दिसून येते. वागळे भागातील किसननगर, शिवाजीनगर, लोकमान्यनगर, सावरकरनगर या परिसरात अनधिकृत इमारतींचे साम्राज्य पसरले असून रामनगर, इंदिरानगर, रूपादेवी, लोकमान्यनगर, कोपरी परिसरात झोपडपट्टय़ा आणि बेकायदा चाळींची संख्या मोठी आहे. हा संपूर्ण मतदारसंघच बेकायदा इमल्यांच्या पायावर उभा आहे. त्यामुळे या समूह विकास योजनेचा मुद्दा या भागात महत्त्वाचा ठरू लागला असून काँग्रेस शासनाने या योजनेची आखणी केली असली तरी त्याचे श्रेय मात्र शिवसेनेने पद्धतशीरपणे स्वत:च्या पदरात पाडून घेतल्याचे चित्र दिसू लागले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे निवडून आले. २००९ मध्ये ठाणे मतदारसंघाचे विभाजन होऊन चार नव्या मतदारसंघांची निर्मिती झाली. किसननगर हे िशदे यांचे कार्यक्षेत्र. त्यामुळे त्यांनी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाची निवड केली आणि मनसेचा प्रभाव असूनही मोठय़ा मताधिक्याने निवडून आले. हा संपूर्ण मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी महापालिकेत निवडून गेलेल्या शिवसेना नगरसेवकांचा आकडाही बराच मोठा आहे. यंदा शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे असे पाचही पक्ष स्वबळावर लढत असल्याने यापूर्वीच्या युती आणि आघाडीतील पक्षांच्या मतांचे विभाजन होणार आहे. भाजपतर्फे संदीप लेले, मनसेतर्फे सेजल कदम तर काँग्रेसतर्फे मोहन तिवारी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली होती. भाजप आणि मनसेचे उमेदवार किती मते घेतात आणि मोहन तिवारी यांना उत्तर भारतीयांची किती साथ मिळते, यावरच काँग्रेसचे गणित ठरणार आहे. वागळे आणि कोपरी परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असून शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला धक्का देणे विरोधकांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

धोकादायक अधिकृत आणि अनधिकृत इमारती, झोपडपट्टी आणि चाळीतील रहिवाशांना क्लस्टर योजनेच्या माध्यमातून सुरक्षित घरे देणे. तसेच मेट्रो, रेल्वे, टीएमटी, एसटी आणि परराज्यात जाणाऱ्या खासगी बस गाडय़ांसाठी मनोरुग्णालयाच्या अतिरिक्त जागेवर टर्मिनल्स उभारणे, कोपरी स्थानक परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सॅटिस-२ प्रकल्प राबविणे,  ठाणे महापालिका हद्दीत बाळासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि कॅन्सर रुग्णालय उभारणे,  वनजमीन व एमआयडीसीच्या जागेवरील रहिवाशांना हक्काची घरे मिळवून देणे, आदी कामांना प्राधान्य देणार आहे.
एकनाथ शिंदे, शिवसेना</strong>

कोपरी परिसरातील सीआरझेड बाधित भागास दिलासा देऊन त्याचा पुनर्विकास करणार. तसेच या परिसरात वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट, आयटी पार्क, क्रीडासंकुल उभारणे, वागळे परिसरातील अनधिकृत इमारतींचा शासनाच्या माध्यमातून पुनर्विकास करणार, मात्र त्यात बिल्डरांना वगळून थेट शासन आणि नागरिकांच्या माध्यमातून ही योजना राबविणार. वनजमिनी आणि एमआयडीसीच्या जागेवर असणाऱ्या घरांना हक्काची घरे देण्यासाठी आरक्षणात बदल आणि पुनर्विकास योजना राबविणार.   
संदीप लेले भाजप

उमेदवार
शिवसेना- एकनाथ शिंदे, शिक्षण- अकरावी, मालमत्ता- जंगम- २ कोटी ३७ लाख २६ हजार ४२४ स्थावर- १ कोटी ९५ लाख २० हजार  
काँग्रेस – मोहन गोस्वामी, शिक्षण- एस.एस.सी., मालमत्ता- जंगम- २३ लाख ३९ हजार ३२६ स्थावर- ६५ लाख
राष्ट्रवादी- बिपीन महाले, शिक्षण- डी.एच.एम.एस., मालमत्ता -जंगम- ३ लाख ७९ हजार ५२१ स्थावर – ४३ लाख, ३८ हजार
भाजप- संदीप लेले- शिक्षण- बी. कॉम., एलएल.बी., मालमत्ता- जंगम- ५ लाख १८ हजार ४५१ स्थावर- १ कोटी ५० लाख
मनसे- सेजल कदम- शिक्षण- एच.एस.सी., मालमत्ता- जंगम- ४३ लाख ७८ हजार २९८ स्थावर- १४ लाख ७० हजार