आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आगमनामुळे नवी मुंबईलगतच्या पनवेलला ग्लोबलटच मिळाले असले तरीही पनवेल विधानसभेची निवडणूक स्थानिक विषयांवर लढविली जात आहे. या मतदारसंघात ४ लाख २३ हजार ४६३ मतदार असून  येथे १४ उमेदवार िरगणात आहेत. मात्र येथील मुख्य लढत भाजपचे प्रशांत ठाकूर यांच्याविरुद्ध शेकापचे बाळाराम पाटील अशी होणार आहे. पनवेलचा वाढता पसारा पाहता येथे ट्रामासेंटर असलेले सरकारी रुग्णालय गरजेचे आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही.
पनवेलच्या सिडको वसाहतींमध्ये अंतर्गत बससेवा नाही, येथील तीन आसनी रिक्षाचालक मीटरवर भाडे आकारत नसल्यामुळे येथील मतदारांमध्ये स्थानिक राजकीय पक्षांविरोधात रोष आहे. किंबहुना त्यामुळेच हा शहरी मतदार भाजप व शिवसेनेकडे आकर्षित झाला आहे. या निवडणुकीमध्ये खारघरच्या टोलच्या सवलतीचा मुद्दा मतदारांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. मुख्य लढत वगळता तिसऱ्या क्रमांकासाठी येथे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यामध्ये चुरस होताना दिसणार आहे.
२००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रशांत ठाकूर विरुद्ध बाळाराम पाटील अशीच लढत होती. मात्र त्यावेळी ठाकूर हे काँग्रेसचे उमेदवार होते. ठाकूरांनी पाटील यांचा १२९६० मतांनी पराजय केला होता. भाजपची पनवेलमध्ये ताकद कमी आहे. मात्र ठाकूरांच्या भाजपप्रवेशामुळे व मोदी फॅक्टरमुळे ठाकूरांचे पारडे जड असले तरीही शेकापच्या ग्रामीण परिसरातील पक्षबांधणीचा फायदा शेकापला होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे माजी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाच वर्षांच्या काळात पनवेलकरांसाठी उड्डाण पूल, फडके नाटय़गृह, आंबेडकर भवन तसेच आमदार व एमएमआरडीए निधीतून सोसायटय़ांच्या अंतर्गत काँक्रीटीकरणाच्या केलेल्या कामांच्या जोरावर ते निवडणूक लढवीत आहेत.  
शेकापचे बाळाराम पाटील हे माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांचे पुत्र या वारसाहक्कामुळे ग्रामीण भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शेकापच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या फौजेमुळे यावेळी शेकापला उत्साह संचारला आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघात एकूण सव्वाचार लाख मतदार आहेत. त्यापैकी शहरी भागात तीन लाख तर सव्वा लाख मतदार ग्रामीण भागात आहेत. आमदारकीची खुर्ची शहरी मतदार ठरविणार आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रशांत ठाकूर यांनी बाळाराम पाटील यांचा १२९६० मतांनी पराभव केला होता.

खारघरच्या टोलमधून स्थानिकांना सूट हा निवडणुकीतील मुख्य मुद्दा आहे. पनवेलच्या विकासासाठी ही लढाई लढत आहे. या अगोदरही मतदारांनी मला संधी दिल्याने परिसरातील विकासकामे आम्ही करून दाखविली आहेत. अशीच सेवा देण्याचा प्रयत्न मी करेन
प्रशांत ठाकूर, भाजप.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावातील रस्ते आणि सिडको वसाहतींमधील ६०० सोसायटय़ांमध्ये विकासकामे केली आहेत. शहरी व ग्रामीण नागरिकांसाठी महागाई, विजेच्या प्रश्नावर आंदोलने केली आहेत. विकास कामांच्या जोरावर आणि शेकापच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या जिवावर मी या निवडणुकीत धनशक्तीचा पराभव करेन, असा मला विश्वास आहे.
बाळाराम पाटील, शेकाप.

उमेदवार
भाजप, – प्रशांत ठाकूर,  *  शिक्षण – बारावी व त्यानंतर अभियंता पदवीचा अभ्यासक्रम         * मालमत्ता – ३७ कोटी ९ लाख सहा हजार ८०६ रुपये, स्थावर – २० कोटी ९३ लाख ७७ हजार ९४२ रुपये
शेकाप- बाळाराम पाटील *   शिक्षण – बीए,  * मालमत्ता – जंगम – एक कोटी दहा लाख ३३ हजार ९४८ रुपये स्थावर – ४ कोटी ७२ लाख १९ हजार ३८७ रुपये
शिवसेना- वासुदेव घरत *  शिक्षण – ११ वी  * मालमत्ता – दोन कोटी ९१ हजार ७६० रुपये, स्थावर –  एक कोटी ९६ लाख ६८ हजार ५६३ रुपये
काँग्रेस-आर. सी. घरत *  शिक्षण –  १० वी पास *  मालमत्ता – जंगम सव्वाचार कोटी ६८ हजार ७७४ रुपये, स्थावर – १२ कोटी ३५ लाख ८ हजार ९४८ रुपये.
राष्ट्रवादी काँग्रेस – सुनील घरत *  शिक्षण – सातवी *  मालमत्ता – जंगम- ३९ लाख ५१ हजार २६३, स्थावर – ९६ लाख २५ हजार