जागतिक स्तरावर श्रेष्ठ दर्जाच्या कथा-कादंबऱ्यांचे निकष ठरविले गेले आहेत. मराठीत मात्र होत असलेल्या समीक्षेत अशा पद्धतीचे निकष आपण ठरवू शकलेलो नाही. त्यामुळे ही समीक्षा गोंधळाची राहील, असे प्रतिपादन प्रा. चंद्रकांत पाटील यांनी केले.
रामचंद्र काळुंखे यांच्या ‘ग्रामीण कादंबरी : आकलन व विश्लेषण’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. प्रा. पाटील म्हणाले, की आपली कादंबरी जगातील एकूण कादंबऱ्यांच्या दृष्टीने नेमकी कुठे आहे, हे पाहावे लागते. कथात्म साहित्यात प्रतिबिंबित झालेले वास्तव हे भासात्मक असते. कल्पनेतून निर्माण केलेली पुनर्रचना करीत असताना लेखक काही घटना, त्याला गवसलेले सत्य यांची निवड करतो. ते अधिक वाचनीय व उत्कंठावर्धक होईल, याची काळजी घेतो. ही उत्कंठा त्याला भाषेतूनच निर्माण करावी लागते. अज्ञाताचा शोध घेणे, तसेच असे साहित्य ज्ञानात्मक पातळीवर जाणे आवश्यक असल्याचेही प्रा. पाटील यांनी सांगितले.
डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी काळुंखे हे कादंबरीचे विवेचन करताना जेथे गुणांची चर्चा करतात तेथे संदर्भाचा आधार घेतात व त्रुटी दाखवताना परखड मते नोंदवतात, असे मत मांडले. अध्यक्षस्थानावरून प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, की या पुस्तकात जवळजवळ सर्वच ग्रामीण कादंबऱ्यांचा बारकाईने विचार केलेला आहे. समीक्षेमध्ये सक्षम लेखन करणारी नवीन पिढी निर्माण होत आहे, त्यात काळुंखे यांचा समावेश करावा लागेल. सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे यांनी केले.