कवी रा. ना. पवार प्रतिष्ठानच्यावतीने दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी ज्येष्ठ पत्रकार राजा माने व कवी भरत दौंडकर (पुणे) यांच्या साहित्यकृतींची निवड झाली आहे. येत्या २२  एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये पुरस्कार वितरण सोहळा आयोजिला आहे.
प्रत्येकी अडीच हजार रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रतिष्ठानचे प्रमुख तथा कवी रा. ना. पवार यांचे चिरंजीव कवी माधव पवार यांनी पुरस्कार मानकऱ्यांची निवड पत्रकार परिषदेत जाहीर केली. पत्रकार राजा माने यांना त्यांच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा’ या ग्रंथाबद्दल, तर कवी भरत दौेडकर यांना त्यांच्या ‘गोफणीतून निसटलेला दगड’ या काव्यसंग्रहाबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्काराचे यंदाचे विसावे वर्ष आहे. कवी फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे कवी माधव पवार यांनी सांगितले.