’ ३३ वर्षांची उरण व अलिबागच्या जनतेची प्रतीक्षा संपणार
’ शासनाची चारशे कोटी रुपयांची तरतूद
रायगड जिल्ह्य़ाची राजधानी असलेला अलिबाग तालुका व उरण यांच्यामधील करंजा ते रेवस या दोन बंदरांतील सागरी अंतर केवळ पंधरा मिनिटांचे असून या खाडीवर करंजा-रेवस पूल उभारण्याचा प्रस्ताव ३३ वर्षांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांनी मांडला होता.त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. नुकताच राज्य सरकारने अलिबाग नगरपालिकेच्या नगराध्यक्षा नमिता नाईक यांच्या पाठपुराव्यानंतर करंजा ते रेवस खाडीपुलाकरिता चारशे कोटींची तरतूद केल्याने उरण तालुक्याच्या विकासाला चालना देणाऱ्या खाडीपुलाच्या निर्मितीमुळे उरण तसेच अलिबागमधील जनतेची प्रतीक्षा संपणार आहे. तसेच अलिबाग मुंबई, उरण ते अलिबाग अंतर कमी झाल्याने पैसा व वेळेचीही बचत होणार आहे.    
रायगड जिल्ह्य़ातील उरण तालुका हा मुंबईच्या शेजारी असला तरी उरणमधून पुढील प्रवास करण्यासाठी येथील नागरिक व प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अलिबाग या जिल्ह्य़ाच्या प्रमुख ठिकाणी कामानिमित्ताने जाण्यासाठी करंजा-रेवस खाडी पार करावी लागते. खाडी पार करण्यासाठी पंधरा मिनिटे लागत असली तरी या मार्गावरील जलप्रवास धोकादायकच आहे. त्यामुळे करंजा-रेवस खाडीवर पूल उभारण्याची मागणी दोन्ही तालुक्यांतील नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहेत.
अलिबागच्या नागरिकांना रस्त्याच्या मार्गाने मुंबईला जाण्यासाठी अलिबाग, पेण व पनवेल असा साठ ते सत्तर किलोमीटरचा प्रवास करावा लागते आहे. तर उरणमधील नागरिकांना पेण ते अलिबाग असा चाळीस ते पन्नास किलोमीटरचे अंतर कापावे लागत आहे. मात्र राज्य सरकारने करंजा ते रेवसदरम्यान खाडीपूल उभारल्यास अलिबाग ते मुंबई हे शंभरपेक्षा अधिक किलोमीटर असलेले अंतर अवघे साठ किलोमीटरवर येऊन चाळीस किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. तसेच उरण ते अलिबाग हे अंतर अध्र्या ते पाऊन तासांवर येऊ शकेल. त्यामु़ळे वेळ व पैशाचीही बचत होणार असल्याने उरणच्या विकासातही भर पडणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.