03 March 2021

News Flash

नाताळचा ताल

दिवाळीत ज्याप्रमाणे सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण अनुभवयास मिळते, तितक्याच अभूतपूर्व उत्साहात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात नाताळ साजरा केला जात असून, यानिमित्त मंगळवारपासून सलग दहा दिवस

| December 25, 2012 01:55 am

दिवाळीत ज्याप्रमाणे सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण अनुभवयास मिळते, तितक्याच अभूतपूर्व उत्साहात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात नाताळ साजरा केला जात असून, यानिमित्त मंगळवारपासून सलग दहा दिवस धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणचे चर्च आकर्षक रोषणाई आणि येशू खिस्त जन्माच्या आकर्षक देखाव्यांनी सजले आहेत. यानिमित्त बाजारात ख्रिसमस ट्री अन् वेगवेगळ्या गिफ्टस्ची रेलचेल झाली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘सांताक्लॉज’ला आणण्याचा मार्गही व्यावसायिकांनी स्वीकारला आहे.
दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली की, प्रत्येकाला नाताळ आणि त्याच्या जोडीला येणाऱ्या थर्टी फस्टचे वेध लागलेले असतात. नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा सण असला तरी सारे घटक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. नाशिकरोड व शरणपूर रोड भागातील ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वसामान्य नागरिक मोठी गर्दी करतात. या प्रक्रियेत सर्वच राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांची चढाओढ सुरू असते. नाताळच्या पाश्र्वभूमीवर, सध्या शरणपूर रस्त्यावरील संत आंद्रिया चर्च, त्र्यंबक नाका चौकातील होलीक्रॉस चर्च, नाशिकरोड येथील सेंट झेवियर्स चर्च, जेलरोडवरील संत अ‍ॅना, देवळाली कॅम्पस्थित सेंट पॅट्रिक चर्च आदी ठिकाणी ख्रिस्त जन्माचे आकर्षक देखावे साकारण्यात आले आहे. बहुतेक चर्च नेत्रदीपक रोषणाईने झगमगले आहेत. नाताळच्या पूर्वसंध्येला प्रत्येक ठिकाणी तयारीची लगबग सुरू होती. ख्रिसमस ट्री, रंगबेरंगी चमकणाऱ्या पताकांमुळे रोषणाईत वेगळेच रंग भरले गेले.
बहुतेक चर्चमध्ये नाताळचे दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ख्रिस्तजन्माचा सोहळा झाल्यानंतर मंगळवारी सकाळी नऊ वाजता बहुतेक ठिकाणी महाभक्ती अर्थात सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे. शरणपूर रस्त्यावरील संत आंद्रिया चर्चमध्ये सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम होईल. २९ व ३० डिसेंबर रोजी धार्मिक गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय आनंद मेळा, विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा, चर्चच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आदी उपक्रमांद्वारे नाताळ हा सण साजरा केला जाणार असल्याची माहिती या चर्चच्या सभासदांनी दिली. याच पद्धतीने उत्तर महाराष्ट्रातील बहुतेक चर्चेमध्ये धार्मिक कार्यक्रम, सामूहिक प्रार्थना यासोबत वेगवेगळ्या स्वरूपाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
घरातही देखावे साकारताना कुटुंबीयांनी अधिकाधिक कल्पकता आणण्याचा प्रयत्न केला. नाताळनिमित्त सजावटीच्या वेगवेगळ्या वस्तूंनी दुकाने सजली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, हा सण केवळ ख्रिश्चनधर्मीय नव्हे, तर सर्व घटक मोठय़ा उत्साहाने हा सण साजरा करत असल्याची प्रतिक्रिया शिरोडे गिफ्टचे अभिजीत शिरोडे यांनी व्यक्त केली. नाताळनिमित्त ५० ते तीन हजार रुपयांपर्यंत ख्रिसमस ट्री, २० ते एक हजार रुपयांपर्यंतच्या किमतीच्या बेल्स, ट्री सजावट साहित्य, म्युझिकल लाइटिंग, पुतळा आदी वस्तूंच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे शिरोडे यांनी नमूद केले.
नाशिक शहरातील बडय़ा व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सांताक्लॉजला आणण्याचा मार्ग स्वीकारला. एकूणच नाताळामुळे उत्तर महाराष्ट्रातील वातावरण एका वेगळ्याच उत्साहाने भारले आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 1:55 am

Web Title: rhythm fo christmas
टॅग : Celebration,Christmas
Next Stories
1 अक्कलपाडय़ाची तीन दशकांची रडकथा
2 अत्याचाराविरोधात विद्यार्थिनींची ‘युनिटी’
3 कॉलेज लाईफ : ‘मिस् एसएमआरके’ वर ‘मिस् तेजस्विनी’ची जबाबदारी
Just Now!
X