दुकानदारासह तिघांना अटक
रास्तभाव दुकानातील तांदूळ काळ्याबाजारात विक्रीला नेल्याप्रकरणी औंढा नागनाथ तालुक्यातील सावळीतांडा येथील रास्तभाव दुकानदार प्रकाश नथू राठोड याच्यासह तिघांना औंढा नागनाथ पोलिसांनी अटक केली.
जिल्हा पुरवठा विभागातील सावळा गोंधळ गेल्या दोन वर्षांपासून जिल्हाभर गाजत आहे. शेकडो रास्तभाव दुकानदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. अनेकांचे परवाने निलंबित करण्यात आले. काहींच्या पूर्ण, तर काही दुकानदारांच्या ५० टक्के अनामत रकमा जप्त करण्याचे सत्र एकीकडे चालू असताना रास्त दुकानातील माल काळ्याबाजारात जात असल्याचे प्रकारही घडत आहेत. यापूर्वी औंढा नागनाथ, सेनगाव, कळमनुरी व कुरुंदा पोलिसांत या बाबत गुन्हे दाखल झाले आहेत. सावळीतांडा येथील रास्तभाव दुकानाचा परवाना यापूर्वी दोन वेळा रद्द करण्यात आला होता. मात्र, या दुकानदारास पुन्हा परवाना मिळतो, या मागील गौडबंगाल काय, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, या कारवाईमुळे पुरवठा विभागाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
उपनिरीक्षक ज्ञानोबा पुरी यांच्या तक्रारीवरून रास्तभाव दुकानदार प्रकाश राठोड, केळीतांडा येथील तेजराव राठोड व टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कुरुंदा पोलिसांनी टेम्पो (एमएच १४ व्ही ८६८८) सोमवारी शिरड शाहूरजवळ पकडला. टेम्पोचालक रामभाऊ आघाव याने मालाविषयी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दुकानदार प्रकाश राठोडसह तिघांना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली.