धान उत्पादकांचा धान खरेदीसाठी महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन सरकारी एजंसी कार्यरत आहेत. धान खरेदीला सुरुवात झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत दीडपट कमी धान शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर विक्रीला आणल्याने एजंसीची चिंता वाढली आहे. धान गेला कुठे, याचे गणित या एजंसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही गवसत नसल्याने पुढील मंजूर केंद्र सुरू करावे की नाही, हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
ओल्या दुष्काळामुळे धानाचे पीक शेतात डौलाने उभे असूनही उत्पादनाला उतारा नसल्याच्या निष्कर्षांपर्यंत हे अधिकारी पोहोचले आहेत. महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनने या वर्षांत ५७ केंद्रांना मंजुरी दिली. आदिवासी विकास महामंडळाने ३७ केंद्रांना मंजुरी दिली. त्यातील फेडरेशनची ४१ केंद्रे सुरू झाली. फेडरेशनच्या खरेदी केंद्रांवर आतापर्यंत १७ हजार ५७९ िक्वटल ७९ किलो धान विक्रीला आला. महामंडळाकडे २० हजार क्विंटलची आवक झाली. गेल्या वर्षीचा तपशील बघितल्यास फेडरेशनला ३५ केंद्रांवरून ४६ हजार २०४ िक्वटल ५८ किलोंची आवक झाली होती. अचानक दीडपटीने घट या एजंसीकडे आली. या धानाची किंमत २ कोटी ३० लाख २९ हजार ५२४ रुपये आहे. कमी केंद्र असतानाही धानाची आवक कमालीची होती. या वर्षांत केंद्रांची संख्या वाढवल्यानंतरही धान खरेदी केंद्रावर पोहोचलेला नाही. त्यामुळे धान व्यापाऱ्यांच्या घशात गेला की, उत्पादनच झाले नाही, या गुंत्यात अधिकारी सापडले.
दुसरीकडे धानाच्या खरेदीला उशीर झाला. त्यामुळे व्यापाऱ्यांना हा धान शेतकऱ्यांनी विकल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, बाजार समितीवरही धानाची आवक कमालीची कमी झाली असून अशीच स्थिती राहिल्यास खाद्य महामंडळाला जाणारा धान इतर जिल्ह्य़ाच्या तुलनेत अतिशय कमी जाण्याची भीती आहे. पुढील महिन्यात धानाची आवक वाढल्यास ही तूट भरून निघेल, परंतु याची ही शक्यता कमी असल्याचे अधिकारी सांगतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 9:36 am