अँग ली दिग्दर्शित ‘लाईफ ऑफ पाय’ या चित्रपटाने एव्हाना जगभरात सगळ्यांना वेड लावले आहे. एकाच बोटीवर असणारा नायक आणि ‘रिचर्ड पार्कर’ नावाचा वाघ यांची ही कथा. ‘लाईफ ऑफ पाय’ चित्रपटाला उत्कृष्ट व्हीएफएक्ससाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आणि या ‘रिचर्ड पार्कर’च्या डिजिटल गंमतीजमती बाहेर आल्या. केवळ संगणकीय करामतींनी ‘लाईफ ऑफ पाय’मधला हा रिचर्ड पार्कर नावाचा जातीवंत ‘बेंगॉल टायगर’ जिवंत केला आहे. हे ऐकल्यावर चित्रपट पाहताना हा वाघ खोटा आहे, अशी कल्पनाही आपण करू शकलो नव्हतो, याची जाणीव आपल्याला होते. पण, ज्या कलाकारांनी हा वाघ जिवंत केला त्यांना स्वत:ला आपल्या या आविष्कारावर विश्वास बसला नव्हता तिथे तुमचीआमची काय कथा.. ‘रिचर्ड पार्कर’ घडवण्यात मोलाचा वाटा असलेल्या कवन अहालपारा या व्हीएफएक्स तज्ज्ञाने सांगितलेली त्याची आठवण..

‘मी अ‍ॅनिमेशनचे शिक्षण संपवून ‘ऱ्हिदम अ‍ॅण्ड ‘ाुज’ कंपनीत दाखल झालो होतो ते वर्ष होतं २०११. तेव्हापासून ‘लाईफ ऑफ पाय’शी नातं जुळलं आहे. म्हणजे गेले दोन-अडीच वर्ष आर अ‍ॅण्ड एचमध्ये या चित्रपटावर काम सुरू होते, याची कल्पना तुम्हाला आली असेल. त्यावर्षी केवळ संशोधनाच्या पातळीवर आमच्याकडे या चित्रपटाचं काम सुरू होतं. या चित्रपटाच्या एकूण ९६० शॉट्सपैकी केवळी २७० शॉट्स हे व्हीएफएक्स नसलेले आहेत. म्हणजे आमचं काम किती आव्हानात्मक होतं, एवढं अ‍ॅनिमेशन करायचंय हा भागच नव्हता. मुळात, या चित्रपटात पाय (सूरज शर्मा) आणि रिचर्ड पार्कर यांची कथा मुख्य होती. एक वाघ, झेब्रा, ओरांग उटान, लाखो मिरकॅट्स असे प्राणीच प्राणी आणि त्यातही भर समुद्रात एका बोटीवर एका लहानशा चणीच्या मुलाबरोबर अडक लेला हा रिचर्ड पार्कर. याना मार्टलच्या कादंबरीत जशी कथाकल्पना रंगवली होती तशी ती चित्रित करणं शक्य नव्हतं. मग संगणकीय करामतीने हे प्राणी अगदी हुबेहुब खरे वाटावेत, असे घडवणं हे आमच्यासाठी मोठं आव्हान होतं. मुंबईत व्हिसलिंग वुड्स संस्थेत अ‍ॅनिमेशनचे शिक्षण घेतलेला आणि आता हॉलीवूडच्या नावाजलेल्या स्टुडिओतल्या हैद्राबाद कार्यालयात काम करणाऱ्या मुलासाठी रिचर्डपार्कर हा ‘सॉल्लिड’ अनुभव ठरणार होता.
माझ्या हाताखाली वीसजणांची टीम काम करत होती. अशा आमच्या कितीतरी टीम जगभरात काम करत होत्या या चित्रपटावर. सुरूवातीला आमच्याकडे रिचर्ड पार्करचे जे संदर्भ आले ते लॉस एंजेलिसमधून आले होते. रिचर्ड पार्कर कसा असेल याची रचनाकृती तिथे तयार झाली होती. आमचं काम होतं ते त्यात प्राण फुंकायचं. बाकी सगळे प्राणी जे होते त्यांची रचनाकृती इथे भारतातच तयार करण्यात आली होती. पण, रिचर्ड पार्करची गंमतच वेगळी होती. आमच्याकडे हजार मिनिटांचे फुटेज होते. हा वाघ बंगाली होता. आमच्यासमोर दृश्य होतं ते बोटीवर पायसमोर उभा ठाकलेला रिचर्ड पार्कर. अ‍ॅनिमेशनच्या दृष्टिकोनातून विचार केलात तर एवढेसे संदर्भ आमच्यासाठी पुरेसे नव्हते. अखेर आमचे संचालक अ‍ॅलेक्झांडर ब्रॅड यांनी बऱ्याचदा ‘स्टफीज’ वापरल्या किंवा ‘मार्क पॉईंटर’ परिधान करून हा वाघ कसा चालत असेल, तो डरकाळी कशी फोडेल अशा कित्येक हालचालींचे बारिकसारिक तपशील दिले. आणि तरीही हा वाघ जिवंत करणं आमच्यासाठी आव्हानच होतं. आम्ही फक्त मॅच मुव्हींग करू शकत होतो. पण, इथे तंत्रज्ञान तुमच्या कामाला येतं. तंत्रज्ञान आणि आमच्या कलाकारांनी घेतलेले अतोनात कष्ट यांच्यामुळे रिचर्ड पार्करला आम्ही हुबेहुब साकारू शकलो. आमची कामगिरी इतकी विलक्षण झाली होती की ज्या ‘किंग’ नावाच्या खऱ्या वाघाचे छायाचित्र अँग ली यांनी दिले होते त्यातला आणि रिचर्ड पार्क र यांच्यातला फरक अँग लींनाही उमगला नाही. त्यांनाच कशाला जेव्हा आमच्या टीमने आयमॅक्सच्या भव्य पडद्यावर लाईफ ऑफ पाय पाहिला तेव्हा हा रिचर्ड पार्कर खरा नाही आपण बनवलेला आहे, याच्यावर आमचाही विश्वास बसत नव्हता. ऑस्कर पुरस्काराच्या रूपाने आमच्या कष्टांना खऱ्या अर्थाने फळ मिळालं आहे. रिचर्ड पार्कर आमच्यासाठी एक नवं चैतन्य घेऊन आला म्हणून तो आमच्यासाठी खास आहे..