डोंबिवली पूर्व आण् पश्चिमेला जोडणारा उड्डाण पूल पार करावा लागतो, म्हणून आम्हाला मागू तेवढे भाडे तुम्ही दिले पाहिजे, असे अजब तर्कट डोंबिवलीतील रिक्षाचालक मांडत आहेत. त्यामुळे किमान अंतरासाठीही (जर मीटर डाऊन केले तर १९ रुपये भाडे होईल)तेथे प्रवाशांना ३० ते ४० रुपये मोजावे लागत आहेत.
डोंबिवलीतील रिक्षाचालकांचे हे तर्कट अत्यंत हास्यास्पद आहे. मुंबईच्या पूर्व आणि पिश्चम उपनगरातही अनेक ठिकाणी पूर्व-पश्चिम भाग जोडणारे उड्डाण पूल आहेत. तेथील रिक्षाचालक मीटर डाऊन करून प्रवाशांची वाहतूक करतात ना, मग डोंबिवलीतील रिक्षाचालक उड्डाणपुलाचे कारण सांगून अव्वाच्या सव्वा पैसे का मागतात, असा सवाल प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.
डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाण पुलावरून जाताना रिक्षाचालकांनी मीटर डाऊन केले तर यात फायदा प्रवाशांचा आहे. त्यामुळे रिक्षाचालक या उड्डाणपुलावरून जायचे असेल तर मनमानेल तसे भाडे उकळतात आणि प्रवाशांना लुबाडतात.
या संदर्भात रविवारी दोन प्रवाशांना आलेले अनुभव अत्यंत बोलके आहेत. स्नेहल अभ्यंकर या ज्येष्ठ महिलेने संध्याकाळी सव्वासात-साडेसातच्या सुमारास स्वामी समर्थ मठ, नािंदवली, डोंबिवली (पूर्व) येथे मुख्य रस्त्याला येऊन पश्चिमेला नाना शंकरशेठ मार्ग येथे येण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षात त्यांचे भाऊ आणि भावजय होते. रिक्षाचालकाला मीटर डाऊन करण्यास सांगितल्यावर त्याने केलेही. नाना शंकरशेठ मार्गावर त्या उतरल्या आणि त्याच रिक्षाने त्यांचे भाऊ आणि भावजय पुढे सुभाष रस्ता येथे आले. हा प्रवास अवघ्या ४२ रुपयात झाला. मीटर डाऊन न करता याच प्रवासासाठी रिक्षाचालकांकडून ६० ते ७० रुपये सांगितले जातात.
दुसरा अनुभव महेश जोशी यांचा. त्यांनीही नांदिवली नाला, डोंबिवली (पूर्व) येथून पश्चिेमेला देवी चौकात येण्यासाठी रिक्षा पकडली. त्या रिक्षाचालकानेही मीटर डाऊन केले. या प्रवासाचे अवघे २५ रुपये झाले. नाहीतर याच प्रवासासाठी रिक्षाचालकांकडून ४० ते ५० रुपये मागितले जातात.
आरटीओ अधिकाऱ्यांची उदासीनता
डोंबिवलीत काही प्रमुख रिक्षातळांवर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी उभे राहून मीटर डाऊन न करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात धडक मोहीम राबवावी, अशी सूचना लालबावटा रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी कल्याणचे डेप्युटी आरटीओ संजय डोळे यांच्याकडे केली आहे. मात्र डोळे यांनी याबाबत उदास्ीानता दाखवली असल्याचे कोमास्कर म्हणाले. आरटीओ आणि वाहतूक पोलीस यांनी रस्त्यावर उतरून धडक मोहीम राबवली आणि मीटर डाऊन न करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरू केला तर सगळ्याच रिक्षाचालकांना जरब बसेल, असेही कोमास्कर यांनी सांगितले.