डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर अनधिकृतपणे रिक्षा उभ्या करणाऱ्या रिक्षाचालकांवर डोंबिवली वाहतूक पोलिसांनी दंड व जप्तीची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे रेल्वेचे प्रवेशद्वार अडवून रिक्षा उभ्या करणारे चालक कालपासून गायब झाले असून मुकाटय़ाने वाहनतळावर रिक्षा उभ्या करून व्यवसाय करीत असल्याचे चित्र दिसत आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे व आम आदमी पक्षाने केलेल्या आंदोलनामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
विष्णुनगर भागात डोंबिवली वाहतूक विभागाचे चार ते पाच पोलीस सायकल पद्धतीने गस्त घालत आहेत. कोणीही रिक्षाचालक विष्णुनगर भागाकडील रेल्वेच्या फलाट क्रमांक एकच्या प्रवेशद्वारावरावर रिक्षा आडवी लावून व्यवसाय करीत असेल, त्याला वाहतूक पोलिसाकडून ताब्यात घेतले जाते. त्याच्यावर दंड आकारला जातो. तो रिक्षा चालक उद्दामगिरी करू लागला तर त्याला रिक्षासह वाहतूक कार्यालयात हजर करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. डोंबिवली पश्चिमेतील फलाट क्रमांक एकजवळील प्रसाधनगृह व प्रवेशद्वारासमोर सकाळी ते रात्री उशिरापर्यंत गणेशनगर, नवापाडा, गरीबाचापाडा भागात जाणारे काही रिक्षा चालक रस्ता अडवून व्यवसाय करीत होते. त्यामुळे नागरिकांना या भागातून चालणे अवघड झाले होते. आम आदमी पक्षाचे प्रशांत रेडीज यांनी पुढाकार घेऊन याविषयी वाहतूक पोलिसांना पत्र दिले होते. ‘आप’ने उपोषण सुरू करताच वाहतूक पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेऊन मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली आहे.