मुंबई  ठाण्यासह संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षांचा भाडेदर समान पातळीवर आणून ठेवण्याच्या बडय़ा बाता मारणाऱ्या राज्य सरकारने नवी मुंबईपल्याड झपाटय़ाने विकसित होत असलेल्या खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, पनवेल यांसारख्या उपनगरांमधील प्रवाशांना अक्षरश: वाऱ्यावर सोडले असून या भागात हजारोंच्या संख्येने रिक्षा ‘सीएनजी’त परावर्तित होऊनसुद्धा प्रवाशांकडून पेट्रोलचा दर आकारत असल्याने महागाईच्या हंगामात १९ रुपयांचे मीटर पाहून प्रवाशांना घाम फुटू लागला आहे. ठाणे जिल्ह्य़ातील महत्त्वाच्या नगरांमध्येही रिक्षा भाडेदराच्या समानीकरणाचे हे सूत्र अद्याप लागू झालेले नाही. या भागात मोठय़ा संख्येने रिक्षा सीएनजीवर धावत असूनही भाडे मात्र पेट्रोल रिक्षाचे आकारत असल्याने प्रवासी नाराज आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात टप्प्याटप्प्याने सीएनजी रिक्षांची वाहतूक सुरू करावी आणि प्रवासी भाडे त्यानुसार आकारले जावे, असे आदेश यापुर्वी राज्य सरकारने दिले आहेत. असे असले तरी या आदेशांची अंमलबजावणी करताना नेमका कालावधी किती असावा, याविषयी अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. रिक्षा भाडे आकारणीसंबंधी मुंबई, ठाणे आणि आता नवी मुंबईला एक न्याय आणि पुढे उरण-पनवेल, खारघर पट्टय़ाला दुसरा न्याय असा भोंगळ कारभार सरकारदरबारी वर्षांनुवर्षे सुरू आहे. गेल्या काही वर्षांत बेलापूरपलीकडे खारघर, कामोठे, तळोजा, कळंबोली, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, पनवेल या पट्टय़ाचे झपाटय़ाने नागरीकरण सुरू आहे. या संपूर्ण विभागाची लोकसंख्या सुमारे १५ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. तुलनेने या भागात पुरेशा प्रमाणावर सीएनजी भरणा केंद्र नसला तरी ऐरोली ते बेलापूर या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सीएनजीची आठ भरणा केंद्रे उभी राहिली आहेत. वाशीसारख्या महत्त्वाच्या उपनगरात यापैकी तीन केंद्रे उभी आहेत, तर खारघरमध्ये एका केंद्राच्या उभारणीचे काम सुरू आहे. नवी मुंबईप्रमाणे खारघर, कामोठे पट्टय़ातील बहुतांश रिक्षांचे यापूर्वीच सीएनजीकरण झाले आहे. सीएनजी रिक्षांच्या हिरवी प्लेट असलेल्या हजारो रिक्षा या भागात आजही धावत आहेत. या रिक्षा सीएनजी भरणा करण्यासाठी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात येत असतात. या भागात पेट्रोलवर धावणाऱ्या रिक्षांची संख्या आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकी राहिली आहे. असे असताना येथील सीएनजी रिक्षांनाही पेट्रोलचा १९ रुपयांचा मीटर दर भरावा लागत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे.
सीएनजी १०० टक्के कधी होणार ?
नवी मुंबईसह कल्याण-डोंबिवली, कळवा, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर या भागांतील रिक्षांचे १०० टक्के सीएनजीकरण व्हावे, अशी मागणी एकीकडे जोर धरू लागली आहे. मात्र, परिवहन विभाग याविषयी फारसा गंभीर नाही, असे दिसते. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ यांसारख्या शहरांमध्ये रिक्षादरांचे वेगवेगळे पॅटर्न राबविले जातात. नवी मुंबईत शेअर रिक्षांसोबत मीटर रिक्षाही मोठय़ा प्रमाणावर धावतात. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर येथे शेअर रिक्षा धावतात. तेथे रिक्षांचे सीएनजीकरण झालेले नाही, त्यामुळे भाडेदराच्या बाबतीत मुंबई, ठाण्यापेक्षा या भागातील रिक्षा प्रवासही महागच आहे. पेट्रोलचे दर वाढताच रिक्षा भाडेवाढीचे संकट प्रवाशांवर घोंगावू लागते, असा आजवरचा अनुभव आहे. ठाणे जिल्ह्य़ात ठाणे शहर, मीरा-भाइंदर आणि नवी मुंबईचा अपवाद वगळला, तर इतर भागांमध्ये मीटरचा दर सध्या १९ रुपये इतका आहे. शहापूर, मुरबाड, पालघर या भागांत सीएनजी भरणा केंद्रांचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे या भागात रिक्षा समानीकरणाचे सूत्र अजूनही कोसो दूर आहे.