येथील नेहरू नगरातील मजुरी काम करणाऱ्या बंटी उर्फ संजय गुलाब काळे या १७ वर्षांच्या तरुणाकडे गावठी रिव्हॉल्वर व ११ जिवंत काडतुसे सापडल्याने जिल्ह्य़ात मोठी खळबळ उडाली. रिव्हॉल्वर व काडतुसे कुठून खरेदी केली याबाबत पोलीस शोध घेत आहेत.
शहरातील कुर्बानशाह अलीनगर येथे रविवारी रात्री नऊच्या सुमारास बंटी काळे यास किरकोळ कारणातून मारहाण झाली. या मारहाणीमुळे बंटी हा बेशुद्ध पडला. तेव्हा त्याच्या खिशात गावठी रिव्हॉल्वर व काडतुसे असल्याची बाब सलीम इनामदार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक नवले यांच्याशी संपर्क साधून अवैध रिव्हॉल्वर व काडतुसाबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बंटीकडून रिव्हॉल्वर व ११ जिवंत काडतुसे जप्त केली व त्यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी बंटी काळेविरुद्ध भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंटी हा विंधन विहिरी पाडण्याच्या गाडीवर मजुरी करतो, असे समजते. त्याची यापूर्वी कुठलीही गुन्हेगारी पाश्र्वभूमी नाही.