जायकवाडीत वरच्या धरणांतून पाणी सोडावे, राज्य सरकार, मराठवाडा व नगर-नाशिक जिल्हय़ांतील त्रिपक्षीय करारातून जायकवाडीचे ९४ टीएमसी पाणी सुरक्षित करावे, या मागणीसाठी भालचंद्र कांगो व राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पाणी हक्क संघर्ष यात्रा सुरू करण्यात येत आहे. यात्रेचा प्रारंभ प्रजासत्ताकदिनी (दि. २६) पूर्णा तालुक्यातील खांबेगाव येथे होणार आहे.
पाणी हक्क संघर्ष यात्रेसंदर्भात क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राज्य सरकार मराठवाडय़ाशी पक्षपात करीत आहे, असा आरोप केला आहे. कधी पश्चिम वाहिनी नद्या बदलायच्या, तर कधी ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचे गाजर पुढे करून समन्यायी पाणीवाटपाच्या कायदेशीर तरतुदीला बगल द्यायची, असा प्रकार सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर जनतेत जागृती घडविण्याच्या उद्देशाने ही संघर्ष यात्रा सुरू करण्यात येत आहे. त्रिस्तरीय करार अस्तित्वात आणावा, असा ठराव ग्रामपंचायत, पाणीवाटप सोसायटय़ा व कालवा सल्लागार समित्यांनी पारित करावा, यासाठी यात्रेत आग्रह धरला जाणार आहे.
खांबेगाव येथील शेतकऱ्यांनी अपुऱ्या कालव्याच्या पाण्याअभावी करपलेल्या भुईमूग पिकाची नुकसानभरपाई सिंचन कायदा १९७६अन्वये मिळविण्यासाठी १९९६मध्ये पाणी हक्काचा लढा दिला होता. याची आठवण ठेवून ही यात्रा खांबेगाव येथून सुरू होत आहे. जायकवाडी लाभक्षेत्रातील १०० गावे फिरून ५ फेब्रुवारीला यात्रेचा परभणीत सत्याग्रहाच्या रूपाने समारोप होणार आहे. यात्रेत कांगो, क्षीरसागर, राम ढवळे, लक्ष्मण शेरे, मुंजा लिपणे, सखाराम मगर आदी सहभागी होणार आहेत.