‘गळ्यात साखळी सोन्याची’ असेल तर बायांनो रस्त्यावर उजव्या बाजूने चाला, असा खात्रीशीर उपाय पोलिसांनी सुचविला आहे. आणि खरेच, हा उपाय अंमलात आणला तर साखळी चोरली जाण्याची धास्ती बरीच कमी होऊ शकते.
सोन्याचे भाव कडाडले असल्याने सोनसाखळी चोरीचा ‘धंदा’ही जोरात आहे. भरदिवसासुद्धा गळ्यात खऱ्या सोन्याचे मंगळसूत्र अथवा अन्य आभूषणे घालून मिरवणे म्हणजे आर्थिक नुकसानीबरोबरच जिवाशीसुद्धा खेळ होऊ शकतो. सोनसाखळ्या चोरणाऱ्यांची एक विशिष्ट पद्धत असते. जिच्या गळ्यातील साखळी हिसकावयाची आहे तिच्या मागोमाग थोडे अंतर चालून योग्य संधी येताच त्या महिलेच्या शेजारी येऊन साखळी खेचायची आणि धूम पळत सुटायचे अशी ही पद्धत असते. तोच प्रकार दुचाकीवरून साखळ्या पळविणाऱ्यांचाही असतो. ‘सावजा’चा थोडे अंतर पाठलाग करायचा, हवी तशी परिस्थिती मिळाली की झपाटय़ाने पुढे येऊन साखळी खेचायची आणि सुसाट सुटायचे ही ‘कार्यपद्धती’ साधारणपणे वापरली जाते. ही कार्यपद्धती लक्षात घेऊनच पोलिसांनी ‘उजवा मार्ग’ सांगितला आहे.
रस्त्यावरून चालताना आपण सर्वसाधारणपणे डाव्या बाजूने चालतो. स्वाभाविकच रस्त्यावरील वाहने आपल्या उजव्या बाजूने पुढे जात असतात. तर समोरून येणारी वाहने आपल्या विरुद्ध बाजूला असतात. आपल्या मागून कोणीतरी मोटरसायकलवरून पाठलाग करीत असेल तर ते आपल्याला लक्षात येणे शक्य नसते. परंतु आपण रस्त्याच्या उजव्या फूटपाथवरून चाललो तर चित्र बदलते. आता वाहनांची रहदारी आपल्या डाव्या हाताला येते. मुख्य म्हणजे ही वाहने समोरून आपल्या दिशेने येत असतात. म्हणजेच मागून आपला पाठलाग करणाऱ्याला उलटय़ा दिशेने वाहन चालवावे लागेल. साखळी चोरणारा असा धोका पत्करण्याची शक्यता कमीच. म्हणूनच पोलिसांनी हा नामी उपाय सुचविला आहे. नवी मुंबईच्या परिमंडळ १ चे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी हा ‘उजवा मार्ग’ शोधून काढला आहे. दिवाळीत सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण वाढत असल्याने याच काळात या उपायाचे प्रात्यक्षिक घेण्याचे त्यांनी ठरविले आहे. त्यासाठी वाशीच्या गजबजलेल्या विभागाची निवड करण्यात येणार असून सर्वसाधारपणे डाव्या बाजूने चालणाऱ्या नागरिकांनी उजव्या बाजूने चालण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. हा प्रयोग वाशीतील प्रमुख रस्त्यावर सध्या करण्यात येणार असून तेथील अनुभवानंतर तो संपूर्ण नवी मुंबईत राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

सोनसाखळीच्या या वाढलेल्या घटनांनी पोलीसही हतबल झाले आहेत. या प्रकारात कधीकधी नागरिकांचा नाहक जीवही जातो. बाजारभावापेक्षा कमी किंमतीत हा माल मिळत असल्याने काही नवोदित सोनारांनी हा मुख्य धंदाच केला आहे. सोने वितळविण्यात हे सोनार माहिर असून राजस्थान व गुजरातमधील मंडळी यात आघाडीवर आहेत.

सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण शहरी भागात लक्षणीय आहे. तुलनेत सोपा, कमी धोक्याचा आणि ‘झटपट’ मामला असल्याने ‘घरफोडी’वालेही आता या धंद्याकडे वळले आहेत. एक (चोरलेलीच) मोटारसायकल आणि एक साथीदार, तोही नसला तरी चालते, एवढेच भांडवल या धंद्याला लागते, अशी ‘मौल्यवान’ माहिती या व्यवसायानिमित्ताने पोलीस कोठडीत ‘मुक्काम’ करणाऱ्या काही ‘व्यावसायिकां’नी दिली आहे. या धंद्यातील काहींचे सूत्र तर ‘एकला चलो रे’ असे असते. हल्ली घरून मिळालेला पॉकेटमनी ज्यांना पुरत नाही, असे हिकमती तरुण, विद्यार्थीसुद्धा या व्यवसायात उतरले आहेत.