कराड-चिपळूण रस्त्यावरील शिरळ (ता. पाटण) गावच्या हद्दीत वडाप जीप व मिनी बसच्या भीषण अपघातात ४ जण ठार ८ जखमी झाल्याप्रकरणी पाटण न्यायालयाने जीपचालक महमद इस्माईल मुकादम (रा. मोरगिरी, ता. पाटण) यास दोषी ठरवून २ वर्षे सक्तमजुरी व १४ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सरकारी वकील संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ५ फेब्रुवारी २००८ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कराड-चिपळूूण रस्त्यावरील शिरळ (ता. पाटण) गावच्या हद्दीत मिनी बस व वडाप जीपचा अपघात झाला. यामध्ये जीपमधील यशवंत बल्लाळ (वय ३५, रा. जांब), बाळासाहेब माने (वय ४३ रा. कराटे, ता. पाटण), सुनील सुतार (वय २०, रा. लेंडोरी), राधाबाई साळुंखे (रा. झाकडे, ता. पाटण), यांचा मृत्यू झाला. या अपघातात ८ जण जखमी झाले होते. जीपचालक महंमद मुकादम याने स्वत:च्या ताब्यातील जीपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून संगमनगर धक्का ते पाटण असे घेऊन जात असताना निष्काळजीपणे भरधाव जीप चालविली. त्यामुळे समोरून येणाऱ्या मिनी बसला जीपची धडक बसवून ती रस्त्यात पलटी झाली.