03 August 2020

News Flash

पनवेलमधील रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूटमार

पनवेल-सायन महामार्गावरील मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरून कळंबोली उरण मार्गालगतच्या हावरे सोसायटीमध्ये जाण्याचा दीड किलोमीटरहून कमी

| June 6, 2015 06:55 am

पनवेल-सायन महामार्गावरील मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरून कळंबोली उरण मार्गालगतच्या हावरे सोसायटीमध्ये जाण्याचा दीड किलोमीटरहून कमी अंतराला दोनशे रुपये मनमानी रिक्षा भाडे आकारून प्रवाशांना भाडय़ापोटी अक्षरश: लुटण्याचा प्रकार सध्या येथील रिक्षाचालकांनी सुरू केल्याने प्रवाशांमध्ये संतप्त वातावरण आहे. मीटरप्रमाणे गेल्यास हेच भाडे २० रुपये होत असतानाही खुलेआम सुरू असलेल्या या लूटमारीकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.
पनवेल तालुक्यामध्ये एकूण पाच हजार २२६ रिक्षा आहेत. या रिक्षांची नोंद प्रादेशिक परिवहन विभागात केलेली आहे. मॅकडोनाल्ड हॉटेलसमोर पनवेल-सायन महामार्गावर द्रुतगती मार्ग संपल्यावर हे रिक्षाचालक द्रुतगती मार्गावरून येणारे प्रवासी, बसमधून उतरणारी कुटुंबे यांना गाठतात. कामोठे, कळंबोली व खांदा कॉलनी येथील हे रहिवासी मॅकडोनाल्ड हॉटेलजवळ थांबत असतात. प्रवासामधील सामानाने भरलेल्या बॅगा, हातात असणाऱ्या लहान मुलांमुळे प्रवासी कासावीस होत असतात. नेमका हाच फायदा घेऊन रिक्षाचालक अवाजवी भाडे घेऊन लूटमार करतात. हा लूटमारीचा खुला खेळ महामार्गावर घडतो, पण प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येते. मॅकडोनाल्ड हॉटेल ते हावरे सोसायटी हा दीड किलोमीटरहून कमी असलेल्या अंतराच्या प्रवासाला तीन आसनी रिक्षा मीटरप्रमाणे गेल्यास भाडे सतरा रुपये ते जास्तीत जास्त २० रुपये होते, परंतु हे रिक्षाचालक २०० रुपये मनमानी भाडे आकारतात. तीन आसनी आणि सहा आसनी रिक्षा व इको व्हॅनचालक यांच्यातील प्रवासी आणि भाडे घेण्याचा वादाचा फटका येथील प्रवाशांना बसत असल्याचे येथे सांगण्यात येते. हा वाद जरी त्यांचा असला तरी त्यांनी तो सामंजस्याने मिटवला पाहिजे, परंतु त्या वादामुळे प्रवाशांना आर्थिक भरुदड पडतो याचा विचारही होणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे.
रिक्षाचालक म्हणतात..
पनवेलच्या तीन आसनी रिक्षा मीटरप्रमाणे का चालवत नाही, याचे उत्तर देताना येथील रिक्षाचालकांनी त्यांची व्यथा मांडली. तीन आसनी रिक्षाचालकांची भाडी सहा आसनी रिक्षा व इको व्हॅनचालक पळवतात. त्यावर प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलीस कोणतीच कारवाई करत नाही. आम्हाला खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वेस्थानकातून भाडे सोडण्याचीच मुभा आहे. कामोठे व खांदा कॉलनीत व्यवसाय करण्यास आम्हाला बंदी आहे. खांदेश्वर व मानसरोवर रेल्वेस्थानकातून आम्हालाही स्थानिक रिक्षाचालकांप्रमाणे भाडे आकारण्याची मुभा असली पाहिजे. प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस आमच्यावरच कायद्याचा बडगा उगारतात. स्थानिकांच्या प्रश्नी आरटीओने ठाम भूमिका घेतली पाहिजे. कोणतेही प्रशासन व प्रसारमाध्यमे याबद्दल बोलायला तयार नाहीत. आम्ही तीन आसनी रिक्षातून तीनच प्रवासी वाहतूक करतो मात्र सहाआसनी व इको व्हॅनमधून बेकायदा प्रवासी वाहतूक सुरू आहे त्यावर कोणतीच कारवाई होत नाही. तीन आसनी रिक्षाचालकांमध्ये अनेक रिक्षा विनापेपर, विनापरमिट सुरू आहेत, त्यामुळे आमच्या व्यवसायात बेकायदा रिक्षांशी आमची स्पर्धा आहे. एवढेच काय सीएनजी गॅसच्या पंपावरही स्थानिकांसाठी वेगळा नोझल आणि आम्हा उपऱ्यांसाठी सामूहिक नोझलप्रमाणे रांगा लागतात. प्रशासनातील कोणताही अधिकारी याची दखल घेत नाही, अशी खंत रिक्षाचालक व्यक्त करतात.
प्रीपेड मीटर पद्धतीसाठी प्रयत्न
मीटरप्रमाणे रिक्षा चालण्याचा प्रश्न नक्कीच निकालात काढला जाईल. प्रीपेड मीटर पद्धत पनवेलमध्ये चालण्यासाठी आरटीओने पनवेल रेल्वेस्थानकाच्या प्रशासकीय विभागाशी संपर्क साधला आहे. जागेविषयीचे परवानगीचे पत्र रेल्वे विभागाने आम्हाला दिल्यावर लगेचच पनवेल रेल्वेस्थानकातून प्रीपेड मीटर पद्धत तीन आसनी रिक्षांतून सुरू होईल. यामुळे सामान्य प्रवाशांना योग्य भाडय़ात प्रवास करता येईल. तीन आसनी रिक्षांचा प्रवास मुक्त करण्याचे धोरण याआधीच आरटीओने स्पष्ट केले आहे. कोणत्याही रिक्षाचालकाला कुठेही कायदेशीर व्यवसाय करण्याची मुभा कायद्यानेच दिली आहे. लवकरच कामोठे रिक्षाचालक  संघटनेच्या प्रतिनिधींशी व कळंबोलीच्या रिक्षाचालक संघटनेच्या प्रतिनिधींशी याबाबत चर्चा करून हा हद्दीचा प्रश्न निकाली काढू. यासाठी वेळीच पनवेलचे सहायक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांचे सहकार्य घेऊ. प्रवाशांची लूट होत असल्यास आरटीओशी संपर्क साधावा. असे प्रवाशांना आवाहन आहे.  
    आनंद पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, पनवेल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2015 6:55 am

Web Title: rikashaw driver charging over in panvel
टॅग Panvel
Next Stories
1 कामोठे आणि कळंबोली वसाहतींना जोडणारा रस्ता पावसाळ्यात बंद?
2 उद्योग निर्मिती, नागरीकरणामुळे उरणमधील भातशेतीत घट
3 जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंडासाठी उपोषण
Just Now!
X