कल्याण-डोंबिवली शहरातील प्रवाशांनी रिक्षाचालकांकडे यापुढे मीटरनुसार प्रवासी भाडे आकारण्याची मागणी केल्यास रिक्षाचालकास त्यास नकार देता येणार नाही. जे रिक्षाचालक प्रवाशांच्या मागणीप्रमाणे मीटरनुसार प्रवासी वाहतुकीस नकार देतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय उशिरा का होईना, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक विभागाने घेतला आहे.
कल्याण-डोंबिवलीतील सुमारे १३ हजार रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या भागात शेअर रिक्षा वाहतुकीचे प्रमाण मोठे आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईप्रमाणे मीटरनुसार भाडे आकारणी केली जावी, अशी येथील प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र, रिक्षाचालकांच्या मुजोरीपुढे प्रवाशांचे काही चालत नाही. विशेष म्हणजे आरटीओचे अधिकारी फारसे काही करत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. दरम्यान, सुमारे १३ हजार रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आल्याने प्रवाशांना मीटर भाडय़ाप्रमाणे प्रवास करण्याचा हक्क आहे. यासंबंधीच्या सूचना रिक्षाचालकांना देण्यासाठी लवकरच मोहीम राबविली जाणार आहे, अशी माहिती कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी पत्रकारांना दिली. कल्याणचे वाहतूक पोलीस निरीक्षक अनिलकुमार यादव, डोंबिवलीचे चव्हाण आणि डोळे यांची नुकतीच बैठक झाली.
त्यावेळी जे रिक्षाचालक प्रवाशाने मागणी करूनही मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक करण्यास नकार देतील अशा चालकांवर कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सर्व रिक्षाचालकांच्या संघटनांनी अशा प्रकारच्या कारवाईस कोणतीही हरकत नसल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. प्रवाशाने मीटरप्रमाणे प्रवास करण्याची इच्छा रिक्षाचालकाकडे व्यक्त केली. रिक्षाचालकाने त्यास नकार दिला तर प्रवाशाने प्रथम रिक्षात बसून घ्यावे आणि तेथून आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांशी हेल्पलाइन क्रमांक १८००२२५३३५ वर संपर्क साधावा, असे आवाहन आरटीओ अधिकाऱ्यांनी केले आहे. मीटर पद्धतीने भाडे आकारणी करण्यास नकार देणाऱ्या रिक्षाचालकाविरोधात एक हजार रुपये दंड किंवा १५ दिवसांसाठी परमीट व परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे आरटीओ डोळे यांनी सांगितले. प्रवाशाने संबंधित रिक्षामध्ये बसूनच हेल्पलाईनवर फोन करावा. रिक्षाचालक पळून गेल्यास अशा कारवाईत अडथळा येईल. त्यामुळे प्रवाशांनी रिक्षामधून उतरू नये असेही डोळे यांनी सांगितले.