पोलिसांना धर्मराज्य पक्षाचे प्रमुख राजन राजे यांनी दिलेल्या ७२ तासांच्या इशाऱ्याला गांर्भीयाने न घेतल्याने सोमवारी सकाळी साडेदहा वाजता कामोठे येथील शिवाजी चौकात राजे यांनी रिक्षाचालकांच्या कुटुंबांसह चक्काजाम करून कामोठे व रोडपालीमध्ये फिरणारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपक्रमाची बससेवा बंद पाडली. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.
कामोठे परिसरात जानेवारीच्या शुभमुर्हूतावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने सुरू केलेल्या बससेवेला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा पहिल्या दिवसापासूनच विरोध होता. मात्र रस्त्यावर उतरून विरोध होण्याची ही पहिलीच वेळ होती. सिडकोने केलेल्या अन्यायामुळे रिक्षांचे स्टेअरिंग हातात घेण्याची वेळ आल्याची आर्जवे रिक्षाचालक रास्तारोको वेळी मांडत होते.  ७०० रिक्षाचालकांच्या कुटुंबातील लहान मुले, महिलावर्ग येथे मोठय़ा प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाला होता. आंदोलनात एक प्रतीकात्मक तिरडीद्वारे प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात स्थानिक राजकीय पक्षांचे नेतृत्व नव्हते. रिक्षाचालकांचे प्रतिनिधी स्थानिक राजकीय नेत्यांनी न केलेल्या सहकार्याचे दाखले देत त्यांच्याविरोधात यावेळी भाषणे करीत होते.
राजन राजे यांनी आपल्या भाषणात स्थानिकांना पोलिसांच्या तुरुंगात डांबण्याच्या कृतीला न घाबरण्याचे आवाहन केले. आजही सन्मानपूर्वक तोडगा काढल्यास आपण हे आंदोलन मागे घेऊ, असे राजे यांनी यावेळी जाहीर केले. एनएमएमटीने स्थानिक रिक्षाचालकांना कायमस्वरूपीचे काम द्यावे. त्यानंतर ही बससेवा सुरू ठेवावी, असे राजे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. धर्मराज्य पक्षाने कामोठे येथील बससेवा सोमवारी बंद पाडल्याने शहरवासीय राजे यांच्या नावाने संताप व्यक्त करत पायपीट करत होते.
बससेवा सुरूच राहणार
कामोठे येथील बससेवा कायमस्वरूपी सुरू राहावी यासाठी वेळीच कठोर उपाययोजना करण्याचे आदेश पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी दालनात बसून स्थानिक पोलिसांना दिले होते. त्यावेळी कुठे गेले आयुक्तांचे आदेश, असा प्रश्न प्रवाशांना पडला होता. आदेशाची अंमलबजावणी करणारे कर्तव्यदक्ष पण हतबल अधिकारी सोमवारी राजे यांच्या विरोधात कोणत्या कलमाखाली कारवाई करावी या विचारात होते. पोलीस उपायुक्त संजय ऐनपुरे यांनी कामोठे बससेवा सुरूच राहणार असून, लोकशाहीमध्ये सर्वाना आंदोलनाचा अधिकार आहे असे सांगितले.