सत्ताधारी व विरोधी खासदारांनी या अधिवेशनात जनलोकपाल विधेयक मंजूर करून गांधीवादी समाजसेवक अण्णा हजारे यांचे प्राण वाचवावे यासाठी दबाव आणावा अशी मागणी येथील ज्येष्ठ समाजसेवक पां. भा. करंजकर यांनी केली आहे. अण्णांनी आपले समग्र जीवन देशभक्तीच्या निष्ठेने व्यतीत केले आहे. जगेन तर जनसेवेसाठी आणि मरेन तर जनसेवेसाठीच असा त्यांनी निर्धार केला आहे. या निश्चयातूनच त्यांनी जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलन केले. ही सत्यता लक्षात घेऊन जनतेने व स्वयंसेवी संघटनांनी १० डिसेंबर रोजी अण्णांच्या आमरण उपोषणास स्वयंस्फूर्तीने पाठिंबा द्यावा, असे आवाहन करंजकर यांनी केले आहे. देशात सर्व स्तरावर भ्रष्टाचाराने देश गिळंकृत केला आहे. सामान्य जनतेला भ्रष्टाचारामुळे जीवन जगणे असहाय्य झाले आहे. भ्रष्टाचार निपटून काढण्याऐवजी त्याला संरक्षण आणि प्रोत्साहन देण्याचे काम सद्याची राजकीय व्यवस्था करीत आहे. या व्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्याची आज नितांत आवश्यकता आहे. अण्णा हजारे यांनी आतापर्यंत राजकारणाबाहेर राहून भ्रष्टाचारविरोधात अतिशय निष्ठेने काम केले आहे. जनलोकपाल विधेयक अधिवेशनात मंजूर करावे यासाठी १० डिसेंबर रोजी राळेगणसिद्धी येथे अण्णा उपोषण करणार आहेत.