News Flash

‘रिश्ता वही, सोच नई’ने जिंकले रसिकांना

.. अन् ‘ती’ सवाई बनली..! सवाई एकांकिका स्पर्धा ‘.. आणि यंदाची सवाई एकांकिका आहे.. ', अशी घोषणा झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळपासून शनिवारी पहाटेपर्यंत आपापल्या एकांकिका सादर करणाऱ्या स्पर्धकांप्रमाणेच

| January 30, 2013 12:44 pm

.. अन् ‘ती’ सवाई बनली..!
सवाई एकांकिका स्पर्धा
‘.. आणि यंदाची सवाई एकांकिका आहे.. ‘, अशी घोषणा झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळपासून शनिवारी पहाटेपर्यंत आपापल्या एकांकिका सादर करणाऱ्या स्पर्धकांप्रमाणेच रवींद्र नाटय़मंदिरात आपापल्या खुच्र्यावर खिळून बसलेल्या प्रेक्षकांचीही उत्कंठा शिगेला पोहोचली. रात्रभर मोठय़ा शिस्तीत रंगलेली ही स्पर्धा कोण जिंकणार, याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू असतानाच यंदाच्या सवाई एकांकिकेचा मान ‘मिथक’च्या ‘रिश्ता वही, सोच नई’ या एकांकिकेला मिळाल्याचे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी जाहीर केले. ‘मिथक’ने यंदा सवाई लेखक, सवाई नेपथ्य आणि सवाई अभिनेत्रीचे पारितोषिक पटकावत ‘सवाई’ गाजवली. वर याच एकांकिकेला प्रेक्षक पसंतीचे पारितोषिकही मिळाले.
दरवर्षी २५ जानेवारीच्या संध्याकाळी सुरू होणारी सवाई एकांकिका स्पर्धा यंदाही त्याच उत्साहात रंगली. यंदाच्या सवाई एकांकिका स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे अंतिम फेरीत आलेल्या सातपैकी चार एकांकिका नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या होत्या. स्पर्धेच्या सुरुवातीला गोव्याच्या जीईएस ड्रामा सर्कलची ‘नट – एसएमआरटी’ ही एकांकिका सादर झाली. एका नटाचा संघर्ष आणि त्याला मिळालेले यश यांचा वेध या एकांकिकेत घेतला होता. वि. वा. ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, वि. वा. महाविद्यालयाच्या ‘इमोशनल अत्याचार’ या एकांकिकेने पुढील आयुष्यात मानवी नातेसंबंध कसे वळण घेतील, याचे एक चित्र उभे केले. चांगला आशय असलेल्या या एकांकिकेचे नेपथ्यही उत्तम होते. मात्र अभिनयाच्या बाबतीत ही एकांकिका काहीशी मागे पडली. त्यानंतर सादर झालेली ‘रिश्ता वही, सोच नई’ ही एकांकिका तर गोळीबंद परफॉर्मन्स, सहज मांडणी आणि कुशल नेपथ्य यांमुळे चांगलीच रंगली. या एकांकिकेचा विषयही नात्यांवरच होता. बदलत्या काळात नाते तेच असले, तरी त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी व विचार बदलला आहे, अशी मांडणी या एकांकिकेने केली.
एस. पी. महाविद्यालयाच्या ‘प्राणिमात्र’ या एकांकिकेने तर जंगलाचा देखावाच नाही, तर अनुभवही दिला. मानवी वृत्ती आणि त्याकडे पाहण्याचा प्राण्यांचा दृष्टिकोन याबाबत या एकांकिकेने अत्यंत प्रभावी भाष्य केले. यातील वाघाचे काम केलेल्या क्षितीज दाते या अभिनेत्याने तर वाघाच्या अनेक लकबी जशाच्या तशा उचलल्या. त्यानंतर सादर झालेली ‘बंध नायलॉनचे’ ही म. ल. डहाणूकर महाविद्यालयाची एकांकिका मात्र साफ फसली. अत्यंत सपक प्रयोग आणि काहीशी ढिसाळ मांडणी यामुळे या एकांकिकेने प्रेक्षकांची निराशा केली. मात्र या एकांकिकेतही मानवी नातेसंबंधांवरच भर देण्यात आला होता.
‘अनेस्थेशिया’ या ‘अनुभव, पुणे’ या संस्थेच्या एकांकिकेत सामाजिक समस्या आणि त्यावरील सामान्य माणसाची थंड प्रतिक्रिया याबाबत भाष्य करण्यात आले. त्यासाठी पुण्यात बळजबरी करून हटवण्यात आलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा, भांडारकर इन्स्टिटय़ूटची नासधूस असे संदर्भ वापरले होते.
शिवाजी महाराज स्वत: प्रकट होऊन भाष्य करतात, हा अनेक एकांकिकांमध्ये वापरलेला फॉम्र्युलाही वापरण्यात आला. सर्वात शेवटी सादर झालेल्या कीर्ती महाविद्यालयाच्या ‘एकुट समूह’ या एकांकिकेतही पुन्हा आई-मुलगा, पती-पत्नी, मुलगा-वडील अशा एकाच घरातल्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकला होता.
यंदाच्या सवाई स्पर्धेचे परीक्षण रोहिणी हट्टंगडी यांच्यासह केदार शिंदे आणि शैलेश दातार यांनी केले.
निकाल
सवाई एकांकिका – रिश्ता वही, सोच नई
सवाई एकांकिका (द्वितीय) – अनेस्थेशिया
प्रेक्षक पसंती – रिश्ता वही, सोच नई
सवाई लेखक – मिहीर राजदा, (रिश्ता वही, सोच नई)
सवाई दिग्दर्शक – क्षितीज दाते (प्राणिमात्र)
सवाई अभिनेता – आरोह वेलणकर, (अनेस्थेशिया)
सवाई अभिनेत्री – भक्ती देसाई, (रिश्ता वही, सोच नई)
सवाई नेपथ्यकार – रणजित पाटील (रिश्ता वही, सोच नई)
सवाई ध्वनिसंयोजन – विक्रांत पवार (प्राणिमात्र)
सवाई प्रकाशयोजनाकार – सचिन दुनाखे (प्राणिमात्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 12:44 pm

Web Title: rishta vahisoch nayei wins the savai ekankika
Next Stories
1 स्वसंरक्षणाचा चाकू ‘किचन’मध्ये, तिखट फोडणीत..
2 ‘रस्ते मोकळे करा, नाहीतर गावी जाऊन शेती करा’
3 विरार रुग्णालय हल्ला :
Just Now!
X