इशारा पातळी ओलांडलेली पंचगंगा नदी आता धोकारेषेच्या दिशेने वाहू लागली आहे. शहरातील सखल भागामध्ये पंचगंगा नदीचे पाणी येण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्य़ात पूरस्थिती गंभीर होत चालली असून गगनबावडा तालुक्यातील टेकेवाडी गावाला कुंभी नदीचा वेढा पडला असल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे. तेथे आपत्ती निवारण कक्ष मदतीसाठी पोहोचला आहे. जिल्ह्य़ातील ७४ बंधारे बुधवारी पाण्याखाली गेले होते. तर ४८ मार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. राधानगरी धरणातून ९ हजार २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्य़ाच्या पश्चिमेकडील भागात पावसाने दाणादाण उडविली आहे. राधानगरी, काळम्मावाडी, वारणा या प्रमुख धरणांतून पाण्याचा मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरू आहे. पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, वारणा, घटप्रभा या प्रमुख नद्या पात्राबाहेरून वाहू लागल्या आहेत.     
कोल्हापूर शहराजवळून जाणाऱ्या पंचगंगेने काल इशारा पातळी ओलांडली होती. बुधवारी राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ४० मीटर होती. धोकापातळी गाठण्यात अवघे ३ मीटर अंतर राहिले आहे. पावसाचा जोर पाहता कोल्हापूर जिल्ह्य़ाला पुराचा धोका स्पष्टपणे जाणवू लागला आहे. पंचगंगेचे पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. नागरी वस्तीमध्ये पाणी घुसण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तर पूररेषेमध्ये मोठय़ा प्रमाणात बांधकाम झाल्याने जयंती नाल्याचे पाणी लक्ष्मीपुरी भागात येऊ लागले आहे. कोल्हापूर शहराला जाणवणारा पुराचा धोका लक्षात घेऊन आज महापौर प्रतिभा नाईकनवरे यांनी नगरसेवक व अधिकाऱ्यांसमवेत पंचगंगा नदीची पाहणी केली. पूर आलेल्या नदीमध्ये बचावाची प्रात्यक्षिके या वेळी पार पडली.     
राधानगरी धरणातील पाच स्वयंचलित उघडण्यात आले आहेत. या दरवाजातून ७ हजार क्युसेक्सचा तर वीजगृहातून २ हजार २०० क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यातून ५६ हजार ५७ क्युसेक्सचा विसर्ग सुरू झाला आहे. जिल्ह्य़ात पावसाची संततधार कायम आहे. गगनबावडा तालुक्यात काल सर्वाधिक १६६ मि.मी.पाऊस झाला. पावसाची संततधार सुरू राहिल्याने जिल्ह्य़ातील ७४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.     
टेकेवाडी या गगनबावडा तालुक्यातील गावाला कुंभी नदीच्या महापुराचा वेढा पडला आहे. या गावाचा अन्य गावांशी संपर्क तुटलेला आहे. तलाठी, आरोग्याधिकारी यांच्यासह आपत्ती निवारण कक्षाचे पथक या गावात मदतीसाठी दाखल झाले आहे. औषधे व जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा तेथे दाखल झाला असल्याचे सांगण्यात आले. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-गगनबावडा, गडहिंग्लज-बेळगाव हे राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.