ऐरोली वीटभट्टी वसाहतीतील एक मजली इमारत रविवारी कोसळल्याने अनधिकृत इमारतींच्या बांधकाम गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबई, पनवेल उरण येथील अशा अनेक इमारती निकृष्ट बांधकामामुळे कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. उरण हे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याने हा धोका अधिक वर्तविला जात आहे. दरम्यान सिडकोची २०१२ नंतरची अनधिकृत बांधकामे पाडकाम मोहीम सुरू असताना ऐरोली, गोठवली, घणसोली या भागात पाडकाम पथकाची पाठ फिरताच पुन्हा बांधकामे जोरात सुरू होत आहेत. सिडकोनेही नावाला कारवाई सुरू केली असल्याचा दिखावा निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातील एक दोन इमारती जमीनदोस्त करण्यासाठी शेकडो पोलीस आणि कर्मचाऱ्यांचा ताफा फिरवला जात आहे. ७ जूननंतर मान्सूनमुळे ही कारवाई थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य सरकारने नवी मुंबई शहर प्रकल्पातील २० अनधिकृत बांधकामे कायम केली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे जिल्ह्य़ातील अनधिकृत बांधकामांवरील कार्य-अहवाल अपेक्षित केला आहे. त्यामुळे सिडको सध्या नवी मुंबईतील काही गावात अनधिकृत बांधकामे पाडण्याची कार्यवाही करत आहे. ही कारवाई सुरू असताना आमदार संदीप नाईक व मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त नेत्यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे सिडकोने दोन दिवस कारवाई थांबवून या नेत्यांशी चर्चा केली. २०१२ पूर्वीच्या बांधकामांना हात न लावता त्यानंतरच्या बांधकामांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत सिडको प्रशासनाने दिले. त्यामुळे या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. ही कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने केली जात असल्याचे सिडको सांगत असून ती थातुरमातूर असल्याचे दिसून येत आहे. गोठवली, घणसोली, नेरुळ, येथे झालेल्या कारवाईत केवळ दोन दोन इमारती जमीनदोस्त करण्यासाठी शेकडो पोलीस व कर्मचाऱ्यांचा ताफा फिरवला जात आहे. वास्तविक पाडण्यात येणाऱ्या इमारतींच्या जवळच इतर शेकडो अनधिकृत बांधकामे उभी राहात असून सिडको त्यांना हात लावण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या कारवाईविषयी प्रकल्पग्रस्तांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे.
सिडकोने २०१२ नंतरच्या इमारतींवर कारवाई करणार असे स्पष्ट केले असताना नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतींवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सिडकोची एकीकडे कारवाई सुरू असताना ऐरोलीतील शिवकॉलनीचा एक भाग असलेल्या वीटभट्टी परिसरातील एका इमारतीची भिंत रविवारी कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण नवी मुंबई पनवेल उरण तालुक्यात बांधण्यात आलेल्या या अनधिकृत इमारतींच्या बांधकामाचा दर्जा इतका खालावलेला आहे की या ठिकाणी कोणत्याही क्षणी मुंब्रासारखी इमारत कोसळण्याची दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात उरण हे भूकंपाचे एक केंद्रबिंदू असल्याने नवी मुंबईला त्याचा धोका जास्त आहे.
ऐरोली भागात जुन्या घरांच्या जागी फिफ्टी फिफ्टी तत्त्वावर टॉवर बांधण्याचे काम सध्या जोरात सुरू असून यासाठी कोणताही आराखडा तयार केला जात नाही. प्रभागातील अनधिकृत बांधकामांना आपला पाठिंबा नसल्याचे जाहीर करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे या अनधिकृत इमारतीत नातेवाईकांच्या नावे ‘अनंत’ फ्लॅट आरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप असा मामला आहे. त्यामुळे प्रभाग अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ऐरोली नाक्यावर मोठय़ा प्रमाणात अनधिकृत इमारती उभ्या राहात असून सिडकोचे त्याकडे दुर्लक्ष आहे. असाच प्रकार गोठवली. घणसोली, कोपरी या भागात सुरू असून सिडकोची कारवाई ही डोळ्यात धूळफेक करणारी असल्याची चर्चा आहे.