डिझायनर कपडय़ांवरील बारीक नक्षीकाम, वस्त्रप्रावरणांमध्ये अलवारपणे गुंफलेल्या बारीक तारा, त्यावरील खास ‘वर्क’.. याचे फॅशनजगतात कोडकौतुक होते. वस्त्रप्रावरणांची निर्मिती करणाऱ्या डिझायनरची वाहवा होते आणि लोक पुढील फॅशन शोची वाट पाहायला लागतात. पुन्हा तेच चक्र. या सर्व चक्रात एक धागा तसाच दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे या वस्त्रप्रावरणांसाठी खास नक्षीकाम करणारे कारागीर. हे कारागीर प्रकाशात कधी येतच नाहीत. नेमकी हीच बाब ओळखून फॅशन जगतातील मान्यवर व पद्मश्री पुरस्कार विजेत्या डिझायनर रितू कुमार यांनी या कारागिरांची मेहनत जगासमोर आणण्याचे ठरवले आहे. ‘मेनी हॅण्ड्स मेक ब्युटिफूल वर्क’ या मोहिमेंतर्गत रितू कुमार या राबणाऱ्या हातांची ओळख जगाला करून देणार आहेत.
डिझायनर आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर कागदावर एखादे डिझाइन रेखाटतो. पण ते डिझाइन कागदावरून प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला कित्येक कारागिरांचे हात लागलेले असतात. कापडाला रंग लावताना कितीतरी डायर्सचे हात रंगून जातात, आयुष्यभर बारीक नक्षीकाम करून एम्ब्रॉयडरी करणाऱ्याचे डोळे अधू होतात, कित्येक धाग्यांना एकत्र करून त्यातून कापड विणणाऱ्याची स्वप्नेसुद्धा त्या कापडामध्ये विणली जातात. पण एकदा कलेक्शन तयार झाले की, त्यावर डिझायनरचे नाव लागते आणि ही सर्व मेहनत कधीच कुणासमोर येत नाही. याच गोष्टीचे भान ठेवत रितू कुमार यांनी त्यांच्या ब्रॅण्डच्या आगामी जाहिरातीमध्ये या कारागिरांना जगापुढे आणत त्यांच्या कामाला महत्व देण्याचा प्रयत्न केला आहे. एस. के. हसीम या कारागिराच्या माध्यमातून ही कथा मांडण्यात आली आहे. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘हमीद माझ्याकडे काम मागायला येताना, केवळ पसे वाचावेत म्हणून बसच्या टपावर बसून प्रवास करायचा. मी त्याच्या गावाला भेट दिली तेव्हा त्याच्या हलाखीच्या परिस्थितीचा अंदाज आला. त्यावेळेस मी त्याला मदत करायचे ठरवले.’ आज याच एस. के. हसीमने रितू कुमार यांच्या लेबलअंतर्गत गावातील ५० कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. बंगालमधील छोटय़ाशा गावातील या कारागिराच्या कामावर प्रभावित होऊन ‘मम्मी-डॅडी मिडिया’ने या जाहिरातींची निर्मिती केली आहे. त्यात चार जाहिरातींचा समावेश असून टेक्सटाइल कारागिरांच्या कामाच्या प्रत्येक अंगाची झलक पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कुठल्याही सोयीसुविधा नसतानाही तन्मयतेने आपले काम करणाऱ्या आणि आपल्या चेहऱ्यावरील हास्य न गमावणारया या हातांना अशारीतीने प्रकाशझोतात आणण्याचा एका डिझायनरकडून केलेला भारतातील हा पहिलाच प्रयोग आहे.