दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यासाठी वैतरणा-कडवा-देव नदीजोड प्रकल्प योजना राबविण्याला प्राथमिक पातळीवर हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. या संदर्भात खा. हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केला होता. या योजनेचा तांत्रिक प्रस्ताव जलसिचंन संस्थेने सुचविला. या प्रकल्पाचा लाभ सिन्नरबरोबर लगतच्या शिर्डी आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहतीलादेखील होऊ शकतो. या शिवाय, दमणगंगा नदीवर एकदरे गावाजवळ पाच टीएमसी धरण बांधून त्यातील पाणी उचलून कश्यपी धरणात आणता येईल. या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याबाबत राज्य सरकारने केंद्राला कळविले आहे.
समुद्र सपाटीपासून ७०० मीटर उंचीवर वसलेल्या सिन्नर तालुक्यातील शेती व पिण्यास पाणी देण्याबाबत आजपर्यंत योजना तयार करण्यात आली नव्हती. शेजारील इगतपुरी तालुक्यात ३३ टीएमसी क्षमतेची धरणे आहेत. सिन्नरला पाणी कसे देता येईल यासाठी जलसिंचन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी या योजनेचा तांत्रिक प्रस्ताव सुचविला. खा. गोडसे यांनी प्रस्तावाची राष्ट्रीय जलविकास  अभिकरणाला पत्र देऊन गारगाई-वैतरणा, कडवा-देव नदी जोड प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुचविले. अभिकरणाने त्यास सकारात्मक प्रतिसाद देत त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाला सूचित केले आहे.  या ठिकाणी पाठपुरावा झाल्यामुळे उपरोक्त प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचे शिफारस पत्र जलसंपदा विभागाने पाठवले आहे.
वैतरणाची उपनदी गारगाई नदीच्या नाल्यावर चार धरणे बांधून ४.५ टीएमसी पाणी उचलून वैतरणा धरणात येईल. तेथून थेट जलवाहिनीद्वारे कडवा धरणात येईल. कडवा धरणातून पुन्हा उचलून ते पाणी सोनांबे येथे देव नदीच्या उगमात येईल. सोनांबे येथील धरणातून १.५ टीएमसी पाणी देव नदीच्या उगमात सोडण्यात येईल. त्यात भोजापूर धरणात व म्हाळुंगी नदीस पाणी सोडण्याचाही प्रस्ताव आहे. तसेच देव नदीच्या प्रत्येक उपनाल्यास पाणी सोडून सर्व पाझर तलाव भरण्यात येतील. तेथून पुढे जलवाहिनीच्या माध्यमातून दोडी-नांदुरशिंगोटे-निर्माण-तळेगाव-रांजणगाव-मिरपूर- निर्मल, पिंप्री- काकडी शिवारात ते नेता येईल. पुढे शिर्डी तसेच पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत थेट वाहिनीने पाणी पुरविता येईल. अशा प्रकारे संपूर्ण सिन्नर तालुक्याचा दुष्काळ दूर करणारी ही योजना असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.

नाशिकसाठी दमणगंगा-एकदरे जोड प्रकल्प
दुसरा प्रस्ताव नाशिकचा दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ात नाशिकचा समावेश होण्यासाठी पाणी उपलब्ध करण्याचा आहे. दमणगंगा नदीवर एकदरे गावाजवळ पाच टीएमसी धरण बांधून त्यातील पाणी २०० मीटर लिफ्ट करून कश्यपी धरणात आणता येईल. तेथून पुढे जलवाहिनीद्वारे पिण्यास व उद्योगांना देता येईल. हा प्रकल्प दमणगंगा-गोदावरी नदी जोड प्रकल्पाचा पहिला टप्पा आहे. पुढील टप्प्यात भूगड धरणाचे पाणी उचलून भूगड धरणाचे पाणी लिफ्ट करून एकदरे धरणात टाकण्यात येईल. या पद्धतीने आणखी एक गंगापूर धरणासाठय़ाइतके पाणी नाशिकला उपलब्ध होऊ शकते. यासाठी खा. गोडसे यांनी पाठपुरावा केल्यावर राज्य शासनाने दमणगंगा-एकदरे प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचे पत्र केंद्राला पाठविले आहे.