देशातील नद्या या नाल्यांच्या स्वरूपात वाहत असून सुशिक्षित लोकांमुळेच नद्यांना हे स्वरूप प्राप्त झाले आहे. ज्या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती ज्या राज्यात राहतात, तेथील नदीच सर्वाधिक प्रदूषित असून नद्यांचे हे स्वरूप बदलत नाही तोपर्यंत हा देश चांगला होऊ शकणार नाही, असे परखड मत मॅगसेसे पुरस्कार मिळालेले आणि राजस्थानात ‘भगीरथ’ची भूमिका बजावणारे राजेंद्र सिंह या व्यक्त केले आहे. तर पाण्यामुळेच भविष्यात नक्षलवाद निर्माण होण्याची भीती हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईच्या एसआयइएस हायस्कूलच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त भरविण्यात आलेल्या ‘जलमेव जीवनम्’ या पाणी या विषयावरील प्रदर्शनाच्या उदघाटन समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी हे विचार मांडले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधानाचे विज्ञान सल्लागार आर. चिदम्बरम यांच्या हस्ते झाले. या समारंभात मोडक सागरमधून तानसा तलावात पाणी नेण्याचा प्रयोग यशस्वी करणारे मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त जलअभियंता प्रकाश लिमये हे ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राजेंद्र सिंह म्हणले की, सध्या नद्यांच्या प्रदूषणाबाबत बोलणे ही फॅशन झाली आहे. प्रथम आपला वैचारिक दृष्टीकोन बदलायला हवा. सरकारने ५० वर्षांंत हजारो कोटी रुपये खर्च केले पण जेथे सुशिक्षित लोक जास्त आहेत, तेथेच नद्यांचे नाले होत आहेत. आजच्या काळातील विज्ञानाने जे व्यापारीकरण केले आहे त्यामुळे पाणी नष्ट होत असल्याचा आरोप करून सिंह यांनी जीडीपीमुळे गरीबी वाढली, आरोग्याची भीती वाढली आणि प्रदूषणही वाढले असे परखडपणे सांगितले.
शहरी भागांमध्ये पाण्याचा गैरवापर टाळला आणि ग्रामीण भागामध्ये पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला तर पाण्यामुळे होणारे वाद थांबतील, असे सांगून पोपटराव पवार म्हणाले, स्वच्छ पाणी नसेल तर आरोग्य बिघडेल. पण स्वच्छ पाण्यासाठी पैसा नसेल तर आरोग्य बिघडणारच. भविष्यात तलावांचे पाणी कोणी घ्यायचे यावरून वाद होऊ शकतात. पाणी वाचविण्यासाठी चांगल्या जनजागृतीच्या चळवळीची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. मोडकसागर मधून वाहून जाणारे पाणी तानसा तलावामध्ये नेण्याच्या उपक्रमाचे श्रेय माझे एकटय़ाचे नसून संपूर्ण जल खात्याचे असल्याचे निवृत्त अभियंता प्रकाश लिमये यांनी विनम्रपणे सांगितले.
पाण्यासाठी एका चांगल्या जनजागृतीची आवश्यकता असून सर्वांनीच त्यात आपले योगदाने देण्याची गरज असल्याचे सांगून आर. चिदम्बरम  म्हणाले की, भारतातील पावसाचे प्रमाण पूर्वीइतकेच असले तरी लोकसंख्या मात्र वेगाने वाढत आहे. प्रत्येकाला किमान पाणी मिळावे यासाठी विज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. पण प्रत्येकानेच पाणी वाचविण्याबरोबर त्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष दिले पाहिजे. पाणी प्रदूषित होणार नाही, याची काळजीही सर्वांनीच घ्यावी.
यावेळी एसआयइएस हायस्कूलच्या वतीने सर्व पाहुण्यांना मानचिन्ह आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एक लाख रुपये रोख, पाणी या विषयावरील सात पुस्तकांचा संच, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शाळेला मिळालेल्या आयएसओ मानचिन्हाबद्दल टपाल विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या खास टपाल पाकीटाचे अनावरण यावेळी करण्यात आले.