शहर आणि परिसरात चोवीस तासात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये एक ठार तर, चार जण जखमी झाले. शहरातील वाढती वाहतूक आणि वाहन सुरक्षितपणे चालविण्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
पंचवटीतील त्रिकोणी बंगल्याजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन जण जखमी झाले. विजय चव्हाण व विष्णू वरकड हे दोघे मोटारसायकलने त्रिकोणी बंगल्यासमोरील रस्त्याने जात असताना दुसऱ्या एका भरधाव मोटारसायकलीची त्यांना धडक बसली. त्यात चव्हाण आणि वरकड दोघे जखमी झाले. या प्रकरणी शिरीष लवटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दुसरा अपघातही पंचवटीतच झाला. काटय़ा मारूती चौफुलीवर भरधाव कारने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणारे श्रावण तुंगाडे (३८) हे डोक्याला जबर मार लागून जागीच ठार झाले. या प्रकरणी कारचालक महिलेला अटक करण्यात आली आहे. तुंगाडे हे गुरूवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास काटय़ा मारुती सिग्नलजवळ रस्ता ओलांडत असताना ज्योत्स्ना दरेकर या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने तुंगाडे यांना कारने धडक दिली. या अपघातात तुंगाडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. या प्रकरणी अशोक तुंगाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दरेकर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काटय़ा मारूती चौफुलीवर कायम अपघात होत असून चौफुलीवरच पोलीस चौकी असतानाही बहुतेक वेळा येथे वाहतूक पोलीस कार्यरत नसतात. त्यामुळे वाहनधारक मर्जीप्रमाणे भरधाव वाहने हाकतात. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आलेली असली तरी ती कार्यान्वित नसते. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या वेळी या ठिकाणी सतत कोंडी होत असते. पंचवटीकडून येणारी काही वाहने विरूध्द बाजुला वळून महामार्गाच्या दिशेने जाण्यासाठी घाई करतात. त्यामुळेही येथे अपगात होत असतात. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
चोवीस तासाथील तिसरा अपघात पंचवटीतील त्रिमूर्ती चौकात घडला. शुभम थोरात (२० रा. राणाप्रताप चौक) आणि ज्ञानेश्वर ढेपले (२०,रा. पाटोदा, ता. येवला) हे दोघे बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास त्रिमूर्ती चौकातील पेट्रोल पंपासमोरून जात असताना त्यांना मोटारसायकलची धडक बसली. या अपघातात दोघे जखमी झाले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाम्यात नोंद करण्यात आली आहे.