शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी परभणीत वसमत रस्त्यावर शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले. तसेच आमदार मीरा रेंगे यांच्या नेतृत्वाखाली महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात पाथरी तहसीलवर मोर्चा काढण्यात आला.
वसमत रस्त्यावर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून उसाला पहिला हप्ता २ हजार २५० रुपये देण्याची मागणी करण्यात आली. शिवसेनेने यापूर्वी २१ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना या विषयावर निवेदन दिले होते. त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने सेनेच्या वतीने हे रास्ता रोको करण्यात आले. केंद्र सरकारच्या हमीभावाप्रमाणे तुरीची खरेदी करावी, तसेच कापूस, सोयाबीन या पिकांना योग्य भाव द्यावा, कापसावर पडलेल्या लाल्या रोगाचे अनुदान शेतकऱ्यांना द्यावे, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. आमदार संजय जाधव, जिल्हाप्रमुख सुधाकर खराटे, उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, तालुकाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव आदींनी या वेळी मार्गदर्शन केले. आंदोलनात अजित वरपुडकर, रामप्रसाद रणेर, ज्ञानेश्वर पवार, दिलीप गिराम, अतुल सरोदे, अनिल डहाळे, शेख अली, प्रल्हाद चव्हाण, सुशील कांबळे, आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पाथरीत मोर्चा
महिला अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेने पाथरीत आमदार रेंगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले होते. जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, उपजिल्हाप्रमुख डॉ. कच्छवे, महिला संघटक सखुबाई लटपटे, तालुकाप्रमुख रवींद्र धर्मे, सुरेश ढगे, संजय कुलकर्णी आदींसह शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते. महिलांवर दिवसेंदिवस अन्याय, अत्याचार होत असून सरकार आरोपींना कठोर शिक्षा करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळेच महिलांमध्ये मोठय़ा प्रमाणावर असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. दिल्लीत घडलेल्या तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने महिलांमध्ये तीव्र संतापाची भावना उमटली आहे. याच पाश्र्वभूमीवर या मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चात विद्यार्थिनी, महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचा समारोप पाथरी तहसील कार्यालयासमोर करण्यात आला. या वेळी आमदार श्रीमती रेंगे यांनी सरकारविरुद्ध कठोर टीका भाषणात केली. महिला अत्याचाराला आळा घालण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून सरकारने वेळीच पावले न उचलल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार श्रीमती रेंगे यांनी दिला.